आवाशी : १ जुलै ते ७ जुलै रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाबंदी असताना लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय कामगारांची आयात होत असून जिल्हाबंदीतही हे कामगार येथे येतात कसे? असा प्रश्न भाजपचे खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी केला आहे.चाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार लोटे - परशुराम येथील औद्योगिक वसाहतीतील श्री पुष्कर पेट्रोकेमिकल्स लि. या कंपनीत शुक्रवारी सकाळी आठ वाजता मध्यप्रदेश येथून एक खासगी बस ३२ कामगारांना घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कंपनीच्या प्रवेशद्वारावर जाऊन चौकशी केली असता ही घटना सत्य असल्याचे समोर आले.
त्यानुसार कंपनीचे व्यवस्थापक प्रभाकर आंब्रे यांची भेट घेऊन हे कामगार येथे आले कसे? असा प्रश्न विचारला असता याबाबत मला काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत लोटेचे माजी उपसरपंच रवींद्र गोवळकर, धामणदिवीचे सचिन देवळेकर व प्रशांत दळी उपस्थित होते. तर आंब्रे यांच्यासह दशरथ चाळके हेही होते.या घटनेची माहिती चाळके यांनी खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना भ्रमणध्वनीद्वारे देताना जिल्हा बंदी असतानाही बस आली कशी? असा प्रश्न विचारला. मात्र, त्यांच्याकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. याचवेळी चाळके व सोबतच्या अन्यजणांनी आलेल्या कामगारांची भेट घेतली. तेव्हा त्या कामगारांना कंपनीच्या कार्यालयाच्या वरील मजल्यावर एका सभागृहात एकत्रित ठेवल्याचे दिसून आले.
कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग व त्यांच्या चेहऱ्याला मास्क नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी प्रसार माध्यमांचे काही प्रतिनिधी त्यांच्यासोबत होते. कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातून सदरचे कामगार दिनांक १ रोजी दुपारी १ वाजता निघून ते पुणेमार्गे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.यानंतर चाळके त्यांचे सहकारी व व्यवस्थापक यांनी लोटे पोलीस दूरक्षेत्रात या घटनेची जाऊन माहिती दिली. खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याशी या घटनेबाबत विचारणा केली असता लोटे येथील कारखान्यात कामावर येण्यासाठी कामगारांना जिल्हाधिकारी यांची परवानगी आहे, परराज्यातून आलेल्या कामगारांकडे तसा परवाना असेल तो तपासून घ्या.
मी देखील याबाबत माहिती घेते असे सांगितले. मात्र, लोटे पोलीस दूरक्षेत्रात वरील ग्रामस्थांनी या परवान्यांबाबत विचारणा केली असता केवळ बसचा परवाना हा पुण्यापर्यंतचा होता असे समोर आले. मग असे असताना ही बस या कामगारांना घेऊन लोट्यात आलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाबंदीच्या आदल्या दिवशी खेडच्या प्रांतांनी एका स्थानिक टिव्ही चॅनलला दिलेल्या माहिती मालवाहतुकीखेरीज कुणाकडे कसलाही परवाना असला तरी त्यांना जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही, अशी मुलाखत दिलेली असताना या बसला अभय का?- रवींद्र गोवळकर,माजी उपसरपंच.