लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेले आठवडाभर संततधार पाऊस कोसळत असल्याने परजिल्ह्यांतून येणारी भाज्यांची आवक घटली आहे. ठरावीक भाज्या बाजारात उपलब्ध असून उपलब्ध भाज्यांच्या दरात मात्र वाढ झाली आहे. पावसात भाज्या भिजत असल्याने काही दिवसांत भाज्या कुजतात. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
कांदे-बटाटे विक्रीसाठी मुबलक स्वरूपात उपलब्ध असून दरही ‘जैसे-थे’ आहेत. कांदे २५ ते ३० रुपये, तर बटाटे २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. घेवडा, गाजर, तोंडली विक्रीसाठी गायब आहेत. फरसबी मोजक्याच विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. वांगी, टोमॅटो, सिमला मिरची, दुधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हिरव्या मिरचीचे दर खाली आले असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कोबी, फ्लाॅवर ४० ते ५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मेथी उपलब्ध असून पावसामुळे पालेभाज्या टिकत नसल्याने ग्राहक खरेदीसाठी टाळाटाळ करीत आहेत. काेथिंबीर पेंढीसह पालेभाज्या १५ ते २० रुपये जुडी दराने विकण्यात येत आहे.
वांग्यासह पावटे, शेवगा शेंगा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वांगी ४० रुपये, पावटा ६० रुपये, तर शेवगा २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. पावटे, शेवग्याला विशेष मागणी होत आहे. पावसामुळे आल्याचा खप चांगला होत असून ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा २० ते २५ रुपये दराने विकण्यात येत आहे.
बाजारात मटार विक्रीसाठी उपलब्ध झाले असून १६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नवीन हंगामातील मटार बाजारात आला असल्याने दर चढ असल्याने ग्राहक खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत.
आषाढी एकादशीला भाविक उपवास ठेवतात. उपवासासाठी रताळ्याचे सेवन केले जात असल्याने बाजारात रताळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ५० ते ६० रुपये किलो दराने रताळी विक्री सुरू आहे. फलाहारासाठी अन्य फळांबरोबर आंब्याला मागणी होत आहे.
पावसाळ्यात भाज्यांची आवक घटते. मात्र, त्या काळात दरही घसरतात. पावसात भाज्या भिजत असल्याने टिकत नाहीत. त्यामुळे एकत्रित भाज्या खरेदी करणे परवडत नाहीत. भाज्यांसाठी कांद्याचा वापर अधिक होतो. कांद्याचे दर अद्याप खाली आलेले नाहीत. त्यामुळे दैनंदिन आहारात दरामुळे आता भाज्या परवडत नाहीत. दरावर निर्बंध असणे आवश्यक आहे.
- जयश्री शेलार, गृहिणी.
इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. कडधान्य डाळींच्या किमतीबरोबर भाज्यांच्या दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे. शासनाकडून महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचा रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे.
- सुमेधा जोग, गृहिणी.