चिपळूण : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनातर्फे सुधारित नळपाणी योजनेचा प्रस्ताव पुढे आला. ८ कोटीची ही योजना आता १५ कोटींच्या पुढे गेली आहे. अद्यापही सुधारित नळपाणी योजना कार्यान्वित झालेली नाही. ठेकेदाराला ३ वेळा मुदतवाढ देऊनही योजनेचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. याबाबत नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चिपळूण विभागाच्या अंतर्गत या सुधारित नळपाणी योजनेच काम सुरु करण्यात आले होते. हे काम चंद्रकांत सुवार यांना देण्यात आले असून सप्टेंबर महिना सुरु झाला तरी ही नळपाणीयोजना अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे मुरादपूर, उक्ताड, कानसेवाडी, बाजारपेठेतील वडनाका परिसरात आजही पाणी प्रश्न कायम आहे. वर्षभरापूर्वी या योजनेचे काम पूर्ण होवून नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र संबंधित ठेकेदार सुवार यांनी या योजनेचे काम वेळेत पूर्ण केलेले नाही. नगर परिषदेकडे मुदतवाढीची मागणी केली. त्यानुसार आतापर्यंत ३ वेळा मुदतवाढ देण्यात आली.मे महिन्यात झालेल्या नगर परिषदेच्या सभेत चार महिन्यात पाणी योजना पूर्ण करण्याची सूचना संबंधित ठेकेदार यांना करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाने ही पाणी योजना दिलेल्या मुदतीत पूर्ण होईल असे स्पष्ट केले होते. मुदतवाढीची तारीख संपली तरी ही योजना अद्याप सुरु झालेली नाही. काही ठराविक ठिकाणी पाईपलाईन व जॅकवेलच्या वीज जोडणी कनेक्शनसाठी काम रखडले आहे. सत्ताधारी व विरोधकही याबाबत पुढे येत नाही. त्यामुळे सुधारित नळपाणी योजनाही लांबणीवर पडली आहे.शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सुधारित नळपाणी योजना सुरु होणे गरजेचे असून २०१३-१४ ची पाणीपट्टी ८०० रुपयावरुन १२०० रुपयांवर करण्यात आली आहे. पाणीपट्टीची बिले मात्र संबंधित ग्राहकांना पाठविण्यात आली आहेत. सुधारित नळपाणी योजना प्रत्यक्षात केव्हा चालू होईल याबाबत साशंकता असून शहरवासियांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
सुधारित पाणी योजना अद्यापही दूरच
By admin | Published: September 04, 2014 11:18 PM