रत्नागिरी : गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे शाळांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून जिल्हा शैक्षणिक निर्देशांक जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेतर्फे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाठी गुणवत्ता कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. विशेषत: स्पर्धा परीक्षेसाठी विशेष लक्ष दिले जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय विद्यालय परीक्षेतही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला आहे. याचा परिणाम जिल्ह्याच्या गुणवत्ता वाढीवर होत आहे.शैक्षणिक निर्देशांक भरताना सहा मुख्य निर्देशांक व त्या अंतर्गत असणाऱ्या एकूण ८३ निर्देशांकाच्या आधारे ६०० गुणांचे गुणांकन केले जाते. भारत सरकारकडून यू-डायस प्लस प्रणालीवर शाळांनी भरलेली माहिती, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, समग्र शिक्षा योजनेतील भौतिक सुविधा मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, दिव्यांगांसाठी सुविधा, स्कूल सेफ्टी व चाईल्ड प्रोटेक्शन अंतर्गत मंजूर बाबी, डिजिटल लर्निंग अंतर्गत मंजूर बाबी, गव्हर्नस प्रोसेसअंतर्गत मंजूर बाबी, लीडर डेव्हलपमेंटअंतर्गत मंजूर बाबी, स्वच्छ भारत व जलसुरक्षा, फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत आदी स्रोतांद्वारे शैक्षणिक निर्देशांक काढला जातो. ही माहिती ऑनलाइन भरल्यानंतर सॉफ्टवेअरद्वारे क्रमांक निश्चित केले जातात.२०१९-२० या वर्षात रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत तृतीय क्रमांकावर होता. त्यात आता सुधारणा झाली आहे. विविध उपक्रम, स्पर्धा, परीक्षा या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी जिल्ह्याने शैक्षणिक गुणवत्तेच्या कामात तृतीय क्रमांक मिळविला आहे. ६०० पैकी ४२८.४८ गुण मिळाले आहेत.
राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये सातारा सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक, सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. बीड चौथा क्रमांक, मुंबई पाचवा, उस्मानाबाद सहा, पुणे सात, लातूर आठ, अहमदनगर नऊ, तर औरंगाबाद जिल्हा दहाव्या क्रमांकावर राहिला आहे