रत्नागिरी : गेल्या पंधरा दिवसांत सोन्याचा दर तब्बल १० ग्रॅममागे ८०० रूपयांनी घसरला असून चांदीही प्रति किलो १००० रूपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे कमी झालेले दर गुंतवणूकदारांसाठी चिंता वाढवणारे असले तरी खरेदीदारांसाठी दिलासादायी आहेत.मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत रत्नागिरीत सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम ५५,६०० रूपये (३ टक्के जीएसटी वगळून) आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,७०० रूपये इतका होता. चांदी प्रति किलो ६५००० रूपये (जीएसटी वगळून) इतकी होती. मात्र, त्यानंतर गुढी पाडवा जवळ येताच सोन्याचा दरही भरभर चढू लागला. १८ मार्च रोजी सोन्याने एकदम साठी ओलांडली. सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी प्रति १० ग़्रॅमला ६०,१०० आणि २२ कॅरेटसाठी प्रति १० ग़्रॅमला ५५,९०० रूपये (जीएसटी वगळून) इतका झाला तर चांदीचा दरही ७ हजारांनी वाढून ६५ हजारांवरून एकदम ७२ हजारांवर गेला. पुन्हा तो ५९,२०० आणि ५५,१०० रूपयांवर आला. मात्र, चांदीचा दर किलोमागे एक हजाराने वधारून ७३,००० रूपयांवर गेली.त्यानंतर एप्रिल महिन्यापासून लग्नसराईला सुरूवात झाली आणि सोन्याचा दरही वाढू लागला. सोने पुन्हा ६१,३०० आणि ५७,००० रूपयांवर गेले. चांदीच्या दरातही सहा दिवसांत तब्बल ५ हजार रूपयांनी वाढ झाली. त्यानंतर सोन्याचा दर कमीजास्त होत होता. मात्र, आता लग्नसराई संपल्यानंतर पंधरवड्यात सोन्याचा दर ६० हजार रूपयांपेक्षा कमी झाला आहे. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅमला ५९,४००, आणि २२ कॅरेट सोने ५५,२०० रूपयांवर आले असून ८०० रूपयांनी कमी झाले आहे. चांदीत मात्र, पुन्हा १ हजार रूपयांनी वाढ झाली आहे.सोन्याच्या गुंतवणूकदारांना घटत्या दरामुळे चिंता वाटत असली तरी सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मात्र, या दरामुळे दिलासा मिळाला आहे.
पंधरा दिवसांत सोन्याची झळाळी ८०० ने काळवंडली; गुंतवणूकदारांसाठी चिंता; खरेदीदारांसाठी दिलासा
By शोभना कांबळे | Published: June 15, 2023 7:25 PM