रत्नागिरी : नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीव मुंबई - गाेवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. आज, साेमवारी (दि ११ ) पहाटे महामार्गावरील गस्तीदरम्यान संगमेश्वर बसस्थानकासमाेर गाेवा बनावटीचा ४ लाख ६५ हजार १२० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत ओंकार इंद्रजीत सावंत व सहआरोपी वैभव मनोज कांबळी यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर व रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या गस्तीदरम्यान गोवा राज्य बनावट दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार या पथकाने संगमेश्वर बसस्थानकासमाेर वाहनांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान गोव्याच्या दिशेकडून येणाऱ्या राखाडी रंगाच्या चारचाकी वाहनाला थांबविण्याचा इशारा करण्यात आला. या पथकाला चुकवून वाहनाचा चालक न थांबता भरधाव वेगाने रिव्हर्स गिअर टाकून तेथून वाहनासह पळ काढत हाेता. भरारी पथकाच्या वाहनांनी त्याला अडवून जागीच राेखून ठेवले. वाहनचालकाच्या ताब्यातील चारचाकी (एमएच ०७, एएस ७३०१) वाहनाची तपासणी केली असता गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे एकूण ४,६५,१२० रुपये किमतीचे ८१ बॉक्स मिळाले. या कारवाईत वाहनासहीत एकूण १६,६५,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यातील संशयित ओंकार इंद्रजीत सावंत व वैभव मनोज कांबळी याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत निरीक्षक संजय दळवी, दुय्यम निरीक्षक सचिन यादव, शैलेश कदम, जवान वैभव सोनावले, महिला जवान सुजल घुडे व जवान आणि वाहनचालक मलिक धोत्रे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक संजय दळवी करत आहेत.