रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचा २०२१ - २२चा पदग्रहण सोहळा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नॉमिनी नासीर बोरसदवाला यांच्या हस्ते झाला. या रोटरी वर्षाकरिता अध्यक्ष म्हणून रोटेरिअन संजीव सुर्वे, सचिवपदी हिराकांत साळवी, खजिनदार म्हणून बिपीनचंद्र गांधी यांची निवड करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन या क्लबला यापूर्वीच १०० टक्के पी. एच. एफ. क्लब असा सन्मान प्राप्त झालेला आहे. या क्लब सदस्यांपैकी माजी असिस्टंट गव्हर्नर रोटे समीर इंदुलकर व त्यांच्या पत्नी श्रेया इंदुलकर यांना २०२०-२१मध्ये ‘मेजर डोनर’ हा मानाचा किताब रोटरीतर्फे बहाल करण्यात आला असल्याने तसेच क्लबचे सदस्य राजेंद्र उर्फ दादा कदम व नूतन खजिनदार बिपीनचंद्र गांधी यांना पी. एच. एफ. (Poul Harris Fellow) हा किताब बहाल करण्यात आला असल्याने पदग्रहण अधिकारी बोरसदवाला यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. शहरातील नाचणे रोड येथील प्रवासी निवाराशेडचे नूतनीकरण रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बोरसदवाला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे नूतन अध्यक्ष संजीव सुर्वे व क्लब सदस्य उपस्थित होते.
क्लब सदस्यांच्या मित्रपरिवारापैकी डॉ. स्वप्ना संदीप खरे, ओंकार भाटकर, स्मिता जयंतीलाल जैन यांना क्लबचे सदस्यत्व व रोटरी पीन बहाल करण्यात आली. क्लबतर्फे प्रतिवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘रत्नांकूर’ या अंकाचे प्रकाशनदेखील बोरसदवाला यांच्या हस्ते करण्यात आले.
.............
या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून क्लबतर्फे बळीराम परकर हायस्कूल, मालगुंड यांना ई-लर्निंग सुविधेकरिता लॅपटॉप प्रदान करण्यात आला. कोविडजन्य परिस्थिती, तौक्ते वादळ व अतिवृष्टीत महावितरण कंपनीच्या कामगारांनी रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात विद्युत पुरवठा कमीत कमी कालावधीमध्ये, प्रसंगी पावसात दिवस-रात्र उपस्थित राहून सुरळीत केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता रामेश्वर बोबडे व प्रधान तंत्रज्ञ रामचंद्र बडगे यांचा पदग्रहण अधिकारी बोरसदवाला यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
फोटो मजकूर
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा पदग्रहण अधिकारी नासीर बोरसदवाला यांच्या हस्ते झाला. यावेळी नूतन अध्यक्ष संजीव सुर्वे, सचिव हिराकांत साळवी आणि खजिनदार बिपीनचंद्र गांधी यांच्याकडे नव्या कार्यकारिणीची धुरा देण्यात आली.