देवरूख : देवळे ग्रामपंचायत क्षेत्रातील काळेश्वरी महिला ग्रामसंघाने स्थापन केलेल्या घरकुल मार्टचा प्रारंभ देवरूख पंचायत समिती सभापती जया माने यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रंजना चिंगळे, पंचायत समिती सदस्य संजय कांबळे आदी उपस्थित होते.
इमारतीचे रविवारी उद्घाटन
रत्नागिरी : येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचे उद्घाटन रविवार, दि. ४ एप्रिल रोजी होणार आहे. वीस कोटी रुपये खर्च करून न्यायालयाची अत्याधुनिक इमारत पूर्ण करण्यात आली आहे. सार्वजनिक विभागाकडून जिल्हा न्यायाधीशांकडे इमारत हस्तांतरित करण्यात आली आहे.
बायोगॅस उद्दिष्टपूर्ती
लांजा : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत लांजा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून तालुक्यात १५ बायोगॅस उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कृषी विभागाकडून तालुक्याला यावर्षी १५ बायोगॅसचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
श्रध्दा जाबरे यांची निवड
चिपळूण : तालुक्यातील अडरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक श्रध्दा जाबरे यांची शासनाकडून उत्कृष्ट गटप्रवर्तक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. व्दितीय क्रमांक मंडणगड येथील प्रा जाधव, तृतीय क्रमांक दाभोळच्या उल्का तोडणकर यांनी मिळविला.
ज्येष्ठांना लसीकरण
चिपळूण : शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोनाची लस देण्यात येत आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी ज्येष्ठांना येणे-जाणे सोयीचे होत नाही. यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत ज्येष्ठांना मदतीचा हात दिला आहे. २२ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली.
विंधन विहिरींना मंजुरी
खेड : जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तालुक्यातील आठ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. यामुळे यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. खोनी, कोंडिवली, बिजघर, सवेणी, दिवाणखवटी, कासई, कावळे आदी ठिकाणी विहिरींना मंजुरी मिळाली आहे.
रोपवाटिकेत वणवा
खेड : खेड-भरणे मार्गावरील तालुका कृषी विभागाच्या रोपवाटिकेत सोमवारी दुपारी वणवा लागला. खेड नगरपरिषदेकडून तात्काळ बंब पाठविण्यात आल्याने वणव्यातून रोपवाटिकेतील शेकडो आंबा-काजूची कलमे बचावली आहेत. सलग सुट्टीमुळे अधिकारी, कर्मचारी सुट्टीवर हाेते.
पालखी मंदिरात
रत्नागिरी : शहराजवळील पाेमेंडीखुर्द काजरघाटी येथे शिमगोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र महालक्ष्मी देवस्थानच्या पालखीचा गावभेट सोहळा रद्द करण्यात आला आहे. काेरोनामुळे पालखी घरोघरी न फिरता मंदिरातच ठेवण्यात येणार आहे.
सुरक्षेबाबत प्रबोधन
गुहागर : रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पाॅवर कंपनीतर्फे रस्त्यावरील वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना रस्ता सुरक्षेसाठी प्रबोधन करण्यात आले. रस्ता सुरक्षेच्या नियमांची माहिती असलेले कार्ड वाहनचालकांना देण्यात आले.