दापोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि शेतीशी निगडित सर्व संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय पोषणमूल्य दिवस साजरा करण्यात आला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातही या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. उत्तम महाडकर, डॉ. आनंद नरंगळकर, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होणार आहे. त्या अनुषंगाने आजच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्घाटन आणि मार्गदर्शन दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये दिशांत कोळप, डॉ. उत्तम महाडकर, डॉ. संजय भावे यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाने विकसित केलेल्या तांबडा भोपळा, घोसाळी, दुधी भोपळा, टोमॅटो, वाली, कार्ली, माठ आदी प्रकारच्या भाजीपाल्याच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आंबा, फणस, जाम, जांभूळ या फळझाडांच्या कलमांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून फणसाचे कोकण प्रॉलिफीक या जातीचे कलम लागवड करून वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले.