लाेकमत न्यूज नेटवर्क
अडरे : कृषी विभागामार्फत सावर्डे मंडलांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी संजीवनी मोहिमेचे उद्घाटन चिपळूण पंचायत समितीचे विद्यमान सदस्य शरद शिगवण व कळंबट गणाच्या विद्यमान सदस्य संजीवनी खापरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत, कळंबट येथे करण्यात आले.
या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने उपस्थित शेतकऱ्यांना मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, १० टक्के रासायनिक खताची बचत करण्याकरिता गिरीपुष्पाचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, कंपोस्ट व गांडूळ खताचा वापर करणे तसेच भात लागवडीच्या चारसूत्री व सगुना भात लागवड तंत्रज्ञान पद्धतीविषयी सावर्डेचे मंडल कृषी अधिकारी संजय भिंगार्डे यांनी माहिती दिली.
पंचायत समिती सदस्य शरद शिगवण, संजीवनी खापरे यांनी जास्तीत जास्त फळबाग लागवड करण्याचे व येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कळंबटच्या सरपंच मनाली घव्हाळे, उपसरपंच तेजस कांबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच संतोष बळकते, सखाराम कोकमकर, ग्रामविस्तार अधिकारी एम. व्ही. कुरई, ग्रामविकास अधिकारी मनोहर महाजन, कृषी सहाय्यक विजय साळुंके व शेतकरी उपस्थित होते.