राजापूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनाेन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कोदवली येथील जननी महिला प्रभाग संघाच्या कोदवलीतील नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, विभागप्रमुख संतोष हातणकर, सरपंच रमेश गोडावे उपस्थित होते.
अध्यक्षपदी प्राजक्ता गोताड
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी पन्हळीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्राजक्ता गोताड यांची एकमताने निवड करण्यात आली, तसेच उपाध्यक्षपदी श्रेया महाकाळ, आरोग्य प्रतिनिधी सुजाता खापले, शिक्षण प्रतिनिधी उदय महाकाळ, प्रतीक्षा ठीक व शिल्पा खापले यांची एकमताने निवड झाली. राजन चौगुले यांनी आभार मानले.
कचऱ्याचे ढीग
राजापूर : शहरात दररोज कचरा नेण्यासाठी घरोघरी घंटागाडी जाते. तरीही शहरातील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीगच ढीग उभे राहिलेले दिसतात. या कचऱ्याच्या ढिगामुळे रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नवजीवन हायस्कूल, कोंढेतड विसर्जन घाट येथे कचऱ्याच्या पिशव्या टाकल्या जात असल्याने श्वानांकडून हा कचरा इतस्त: पसरला जात आहे.
एस. टी. बस सुरू
सावर्डे : राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाच्या पाटण आगारातर्फे कोकणातील गणेशभक्तांसाठी २५ ऑगस्टपासून बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वारगेट, कोथरूड, वारजे, पाटण ते चिपळूण कासे अशी ही बससेवा सुरू झाली आहे. या गाडीचे आगाऊ आरक्षण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अर्चना वाघमळे यांची बदली
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांची सातारा येथे बदली झाली आहे. वाघमळे यांनी जुलै २०१९ मध्ये पदाची सूत्रे हाती घेतली होती. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती.
कृती आराखडा
रत्नागिरी : जिल्ह्यातील नगर पंचायती व नगर परिषदांच्या पुढील स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. शून्य कचरा व रस्ते दत्तक योजनेची अंमलबजावणी केली आहे. यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नगर प्रशासनांतर्गत असलेल्या १,५०५ किलोमीटर रस्त्यांपैकी १०८ किलोमीटरचे मुख्य रस्ते असून, यातील जास्तीत जास्त रस्ते या योजनेंतर्गत दत्तक देण्याचा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे.
कचरा साफ करण्याची मागणी
खेड : भरणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये शिवनेरीनगर भागातील पाटीदार भवनजवळ साचलेला कचऱ्याचा ढीग साफ करण्याची मागणी होत आहे. कचऱ्याचा ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पोलिसांकडून कारवाई
रत्नागिरी : शहरातील मुख्य मार्गावर शहर पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू आहे. विनाहेल्मेट, विनाकागदपत्र, शिवाय नियमबाह्य वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांना हेरून कारवाई करण्यात येत आहे. शहरात हेल्मेट सक्तीचे असतानाही अंतर्गत मार्गावरून वाहने हाकताना हेल्मेटचा वापर टाळला जात आहे.