देवरुख : नगरपंचायत क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या पथदीपांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. बोटकेवाडी, कोल्हेवाडी, हसमवाडी, गेल्येवाडी, बागवाडी, गोपाळवाडी, पठाणवाडी, मोगरणे येथील पथदीपाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. देवरुखच्या सर्व भागात ९०० दिवे बसविण्यात येणार आहेत.
शिक्षकांना पदोन्नती
खेड : पंचायत समिती शिक्षण विभागातील जिल्हा परिषदेच्या चार शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारीपदी बढती मिळाली आहे. स्रेहल प्रभू, धनश्री कुलकर्णी, स्मिता साळुंखे, सुभाष यादव यांना बढती मिळाली असून त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
लिंगायत यांची निवड
देवरुख : महाराष्ट्र कर्जदार, जमीनदार, हक्क बचाव संघर्ष समितीच्या संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी तुरळचे दत्ताराम लिंगायत यांची निवड करण्यात आली आहे. लिंगायत हे न्यू एलपीजी डिलर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य, महाराष्ट्र लिंगायत सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
विविध स्पर्धांचे आयोजन
खेड : शहरातील शिवतर रोड येथील टायटनचा राजा कलाक्रीडा सांस्कृतिक मित्र व महिला मंडळातर्फे दिनांक १० ते १९ सप्टेंबरअखेर गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, अथर्वशीर्ष पठण, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, पाककला स्पर्धा होणार आहे.
धोबी घाटाची स्वच्छता
चिपळूण : खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळातर्फे खेर्डी टेरवरोड येथील धोबी घाटाची स्वच्छता करण्यात आली. मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. महापुरामुळे धोबी घाटाची चिखलामुळे दुर्दशा झालेली दशरथ दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे व पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली.