खेड : गेले चार दिवस खेड तालुक्यात पावसाने संततधार लावली असून, गेल्या चोवीस तासांत ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या शेवटी पडलेल्या पावसाने या महिन्याची सरासरी गतवर्षीपेक्षा वाढवली आहे. तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे जगबुडी नदीने गुरुवारी (२९ जून) रोजी इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटर तर धोका पातळी ७ मीटर आहे.गेले चार दिवस पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, २९.०९ टक्के धरण भरले आहे. मुसळधार पावसाने तुळशी बुद्रुक येथील प्रकाश कृष्णा सुतार यांच्या घराच्या पडवीवर दगड कोसळून सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले आहे. आंबवली येथील लावण्या दीपक सकपाळ यांच्या घरावर झाड पडल्यामुळे घराचे अंशतः नुकसान झाले आहे. या घराचा पंचनामा करण्यात आला असून, सुमारे ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.यावर्षी पहिल्यांदाच गुरुवारी जगबुडी नदीची पातळी ५.३० मीटरपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे जगबुडी नदी काठच्या गावांना प्रशासनाने सावधगिरीचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासांत झालेल्या ६२ मिलिमीटर पावसासह जून महिन्यात एकूण ३४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत २४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
रत्नागिरीत पावसाची संततधार; खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 7:24 PM