देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत देवरुख पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आठ गावांचा समावेश संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीत अधिकृतरीत्या करण्यात आला. कोळंबे, सोनगिरी, आंबेड (खुर्द), मानसकोंड, कांदळकोंड, वांद्री तसेच कांटे, तळे या गावांचा समावेश आहे.
ज्येष्ठ कलाकारांना मार्गदर्शन
रत्नागिरी : ‘कलावंत मानधन’ योजने संदर्भात राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांनी मार्गदर्शन केले. कोकण नमन कलामंचच्या तालुका शाखेतर्फे कलावंत मेळावा आयोजित केला होता. यावेळी अध्यक्ष प्रभाकर कांबळे, उपाध्यक्ष अरुण कळंबटे, संगमेश्वरचे सभापती परशुराम वेल्ये आदी उपस्थित होते.
पीपीई किटचे वाटप
लांजा : द प्राईड इंडिया या संस्थेतर्फे लांजा संगमेश्वर तालुक्यातील गावांमध्ये शेतीपूरक प्रकल्प राबविण्यात येत आहे. या संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना हायजीन किट व पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
आजपासून प्रवेश प्रक्रिया
रत्नागिरी : इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. महाविद्यालयाने शक्य झाल्यास ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांनी केल्या आहेत. १८ ते २३ ऑगस्टपर्यंत अर्ज देणे - स्वीकारणे, २४ ते २६ ऑगस्ट रोजी प्रवेश अर्जाची छाननी केली जाणार आहे.
महागाई भत्त्याची मागणी
रत्नागिरी : ग्रामीण डाकसेवकांना जानेवारी २०२० पासून महागाई भत्त्याचा १८ महिन्यांचा फरक मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या अठरा महिन्यांचा महागाई भत्ता ग्रामीण डाकसेवकांना द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.