रत्नागिरी : महाराष्ट्र सरकारला रिफायनरीची चिंता नाही. त्यांना चिंता आहे ती ३०९ भूमाफियांची आणि या भूमाफियांच्या यादीमध्ये जास्तीत जास्त शासकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी (२९ एप्रिल) रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी त्यांनी या ३०९ जणांची यादी पत्रकार परिषदेत झळकवली.यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रमोद शेरे, प्रदीप साळवी, प्रशांत साळुंखे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाठीमार झालेला नाही. जबरदस्ती तसेच छळ झालेला नसल्याचे जाहीर केले होते. त्यावर राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाला शोभणार नाही, असे वक्तव्य केले, हे योग्य नाही. कालच्या आंदोलनात भूमाफियांचे गुंड तिथे आले होते. दलालांचे प्रतिनिधी हातात दगड घेऊन आले होते. त्यांचा पण शोध घ्यावा, असे राऊत म्हणाले.मुख्यमंत्री, उद्योगमंत्री हे भूमाफियांचा मोबदला देणे हा उद्देश घेऊन हा प्रकल्प रेटू पाहत असाल तर जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आज जे काही होत आहे ते भूमाफियांचा मोबदला देण्यासाठी, असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला.
रिफायनरीतील भूमाफियांच्या यादीत शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट
By रहिम दलाल | Published: April 29, 2023 3:41 PM