कृषी पदविकेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता अरविंद तानाजी जाधव या तरुणाने शेती करण्याचे निश्चित केले. पारंपरिकतेऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांनी केला आहे. गेली १५ वर्षे शेतीतून उत्पन्न मिळवित असतानाच त्यांनी दहा लोकांना बारमाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोकणच्या लाल मातीत विविध पिके, आंतरपिके घेत अर्थार्जनाचा मार्ग शोधला आहे.
अरविंद आंबा उत्पादन तर घेत आहेतच, शिवाय बारमाही भाजीपाला उत्पादन घेत आहेत. पावसाळ्यात भात उत्पादन घेताना त्यांनी नर्सरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरीच्या मागे न लागता, शेतीच करण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी स्वमालकीची काही जागा खरेदी करून त्यामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आंबा, काजू, नारळ, चिकू, पेरू, फणस, लिंबू आदी विविध फळझाडांसह गुलाब, माेगरा, जास्वंद, अबोली, सोनचाफा, झेंडू अशी फुलझाडे तसेच निरनिराळ्या प्रकारची शोभिवंत झाडे, कुंड्या, अडकविण्याच्या कुंड्यांतील रोपे तयार करून नर्सरी व्यवसाय सुरू केला आहे. सुरुवातीला त्यांनी रोपे तयार केली, मात्र विक्रीसाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यांच्याकडील रोपांचा दर्जा उत्तम असल्याने बागायतदारांकडूनच प्रसिध्दी मिळत गेली. त्यांच्याकडील झाडांना विशेष मागणी होत असून वर्षरात लाखभर रोपांची विक्री होत आहे.
वीस गुंठ्यांवर पावसाळ्यात डोंगरउतारावर भात लागवड करीत आहेत. टोचण पध्दतीने लागवडीची नूतन पध्दत अवलंबली असून त्यातून त्यांना चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे. पाण्याचा निचरा तत्काळ होत असल्याने भाताचा उतारा उत्तम प्रतीचा आहे. चार एकर क्षेत्रावर पपई लागवड नोव्हेंबरमध्ये केली आहे. तैवान जातीच्या वाणांची निवड केली असून, इस्लामपूरहून रोपे आणली. वाफे तयार करून मल्चिंग केले आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करीत आहेत. नाेव्हेंबरमध्ये लागवड केली असली तरी उत्पन्न जुलैपासून सुरू होणार आहे. पपईत कलिंगडाची आंतरपीक लागवड केली. नामधारी (७७७) वाणाची लागवड केली असता, त्यांना नऊ टन उत्पन्न प्राप्त झाले आहे. दोन एकर क्षेत्रावर भाजीपाला पीक घेत आहेत. वाल, भेंडी, काकडी, गवार, मुळा, माठ याशिवाय आल्याचे, कंदमुळांचे उत्पादन घेत आहेत.
विक्रीसाठी स्टाॅल
शेतीच्या मळ्याबाहेरच जाधव यांनी विक्री स्टाॅल उभारला आहे. रस्त्यालगतच स्टाॅल असल्याने विक्री चांगली होते. येता-जाता ग्राहक थांबून भाज्या, कलिंगडे, आंबा, शिवाय नर्सरीतून झाडे खरेदी करीत आहेत. जाधव आंबा उत्पादन घेत असले तरी मार्केटवर अवलंबून न राहता, खासगी विक्रीवर त्यांचा भर आहे. ग्राहक थेट संपर्क साधून मागणी नोंदवित आहेत.
कायमस्वरूपी रोजगार
अरविंद यांनी शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष केंद्रित केले आहे. नर्सरीसह बारमाही शेतीमुळे त्यांच्याकडे कायमस्वरूपी दहा लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. खत व्यवस्थापनापासून रोप निर्मिती, भाजीपाला लागवड, झाडांचे योग्यवेळी कटिंग, काढणी, विक्रीपर्यतची सर्व कामे विभागली आहेत. नर्सरी व्यवसायातून जाधव यांना चांगले उत्पन्न लाभत आहे.
गांडूळ खत निर्मिती
शेतातील पालापाचोळा, काडीकचरा गोळा करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्यात येत आहे. गांडूळ खताचे स्वतंत्र युनिट उभारले आहे. दरवर्षी सेंद्रीय व गांडूळ मिळून एकूण सात ते आठ टन खत निर्मिती करीत असून पाहिजे त्या खताचा वापर करून अन्य खत मात्र विक्री करीत आहेत. सेंद्रीय उत्पादनांवर त्यांचा विशेष भर आहे.
बारमाही शेती
पावसावर अवलंबून शेतीऐवजी बारमाही शेती जाधव करीत असल्याने योग्य नियोजन ते करीत आहेत. लागवडीपासून विक्रीपर्यंत बारकाईने पिकावर लक्ष ठेवत असल्याने उत्पादित फळे, भाज्यांचा दर्जा उत्तम आहे. त्यामुळे विक्रीसाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्याच्या स्टाॅलवरच विक्री सुलभ होत आहे.