लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भातशेती, भाजीपाला लागवडीसह नर्सरी व्यावसायातून रत्नागिरी तालुक्यातील वळके गावातील शेतकरी विजय दत्तात्रय सावंत यांनी उत्पन्नाचे साधन निर्माण केले. पारंपरिक पध्दतीने शेती करतानाच सावंत यांनी दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केले असून, त्यामधून उत्पन्न मिळवित आहेत. उत्तम नियोजनामुळे सावंत गेली २५ वर्षांपेक्षा अधिक शेतीमध्ये रमले आहेत.
विजय सावंत यांनी १९९४-९५ मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. ब्रॉयलर, फायटर या जातीच्या कोंबड्या त्यांनी सुरुवातीला आणल्या. एक महिन्याचे चारशे पक्षी त्यांनी मिरज येथून आणले होते. त्यावेळी कुक्कुटपालन व्यवसायाचा प्रसार झाला नसल्याने घराजवळ एक खोली बांधली. अडीच वर्षे हा व्यवसाय केल्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले. प्रारंभी त्यांनी आंबा, काजू कलमांची नर्सरी सुरू केली. अडीच हजार कलमे बांधण्याचा परवाना त्यांनी घेतला. दर्जेदार कलमे बांधून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला. कलमांसाठी लागणारे खत तयार करण्यासाठी शेण विकत घ्यावे लागत होते. आर्थिकदृष्ट्या ते परवडत नसल्याने त्यांनी मुरा जातीच्या दोन म्हैशी विकत घेतल्या. तिथून दुग्धोत्पादन व्यवसायाला प्रारंभ झाला.
गेल्या पंधरा वर्षांत सावंत यांच्या गोठ्यात १३ मुरा जातीच्या म्हैशी आणि एचएफ जातीच्या ६ गाई आहेत. रेडे, वासरे मिळून ४२ गुरांचे पालनपोषण ते करीत आहेत. प्रतिदिन ४० ते ४५ लिटर दुधाचे उत्पादन प्राप्त होते. वळके गावासह पाली पंचक्रोशीतच दुधाची विक्री करीत आहेत. दूध काढण्यापासून विक्री करण्यामध्ये त्यांचे बंधू विलास सावंत यांचा मोठा हातभार आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर विलास यांनीही नोकरीच्या मागे न लागता घरातील व्यवसाय वृध्दीसाठी मदत सुरू केली. दुग्ध व्यवसायासह शेतीची कामे विजय यांच्या पत्नी आणि मुली आळीपाळीने सांभाळत आहेत. दूध वाढविण्यासाठी गुरांना ओला चारा, नाचण्याची काड वापरत आहेत.
नोकरी न मिळाल्यामुळे कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून शेतीकडे वळलो. शेतीसह विविध जोडव्यवसाय सुरू केले. कुटुंबियांसह परिश्रम घेत असल्याने चांगले अर्थार्जन प्राप्त होत आहे. कोकणच्या लाल मातीत विविध प्रकारची पिके घेता येतात. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटीची आवश्यकता आहे. योग्य नियोजन व कृषी विभागाचे मार्गदर्शन असेल, तर भरघोस उत्पन्न प्राप्ती होते.
- विजय सावंत, शेतकरी, वळके.
सेंद्रिय भाजीपाला
एक एकर क्षेत्रावर भातशेती करीत असून, काही वर्षे सह्याद्री वाणाची लागवड करीत आहे. गांडूळ खत, गोमूत्र याचा वापर शेतामध्ये करून भात लावणीपूर्वी शेणखत घातले जाते. त्यानंतर दोनवेळा कोळपणी करण्यात येते. गिरीपुष्पाचा सात दिवस पाला कुजवून तो शेतामध्ये टाकला जातो. त्यामुळे जमिनीची पोत सुधारण्यास मदत होत आहे. भातामध्ये गांडूळ खत वापरत असल्याने भरघोस उत्पादन प्राप्त होत असल्याने शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कालवड पैदास
परजिल्ह्यातील गाई, म्हैशींवर स्थानिक वातावरणाचा परिणाम होत असल्याने दूध उत्पादन घटते. यासाठी एचएफ गाय आणि किल्लार बैल यांच्यापासून कालवडींची पैदास करण्यास सुरवात केली आहे. त्याचा फायदा होत असून, गाईंच्या दुग्धोत्पादनातही वाढ झालेली आहे. तोच प्रयोग मुरा म्हैशीसाठी केला आहे.
कुक्कुटपालन
शेतीला विविध व्यवसायांची जोड दिली, तर उत्पन्नात वाढ होते. याचा विचार करून फायटर, कडकनाथ, कावेरी या जातीच्या कोंबड्यांचे त्यांनी पालन केले. तीन ते चार महिन्यांनी त्यांची विक्री होते. पूर्ण वाढलेल्या कोंबडीचा दर पाचशे रुपये इतका आहे. या कोंबड्यांसाठी घरगुती खाद्य वापरण्यात येत आहे.