रत्नागिरी : कोविड कालावधीत रुग्णसेवा करताना देशभरात सुमारे ७०० डाॅक्टर मरण पावले. इंडियन मेडिकल असोसिएशन (आय. एम. ए.)चे सर्व डाॅक्टर्स कोरोनाशी लढण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाच देशभरात होणारे हल्ले, शाब्दिक चिखलफेक याचा संयमाने निषेध व्यक्त करून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवारी १८ रोजी आय. एम. ए.चे सर्व डाॅक्टर्स देशभरात काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे आय. एम. ए.च्या रत्नागिरी शाखेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
आय. एम. ए.चे अध्यक्ष डाॅ. नीलेश नाफडे, सचिव डाॅ. नितीन चव्हाण आणि कोविड समन्वयक डाॅ. निनाद नाफडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकात असे नमूद केले आहे की, रामदेवबाबा यांनी या कठीण समयी आमच्यावर केलेले नामुष्कीचे आरोप, अपमानास्पद चिखलफेक आणि बिनबुडाच्या दोषारोपामुळे डाॅक्टरांमध्ये भयाची जाणीव, शारीरिक इजा आणि मानसिक क्लेष झाले आहेत. एकीकडे पंतप्रधान कोरोना योद्धे म्हणून डाॅक्टरांचा विशेष सन्मान करतात. त्याच वेळी अन्य ठिकाणी डाॅक्टरांवर भ्याड हल्ले होतात. रामदेवबाबांसारखे अनभिज्ञ लाेक अवमानजनक वक्तव्ये करतात, ही बाब चिंताजनक असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
देभरातील ॲलोपथी डाॅक्टरांच्या मनोबलावर याचा विपरित परिणाम होत आहे. याबाबत संघटनेने पंतप्रधान आणि हिंसा झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूनही आसामच्या मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता इतर मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे. या अपप्रवृत्तीचा निषेध काम बंद आंदोलन करून केला जाणाार होता. मात्र, सध्याचे कोरोनाचे संकट पाहता जबाबदारीचे भान ठेवून हा निषेध अधिक संयमाने व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी काळ्या फिती लावून रुग्णसेवा करणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
आय. एम. ए.च्या अशा आहेत मागण्या :
- आरोग्य संस्था व आरोग्यकर्मी संरक्षणार्थ केंद्रीय कायदा असावा. त्याचा समावेश IPC / CRPC अंतर्गत कलम मिळावे.
- सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांना ‘अति सुरक्षित क्षेत्र’ म्हणून जाहीर करावे.
- डाॅक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवरील खटले द्रुतगती न्यायालयात चालवावेत आणि कठोर कारवाईची तरतूद असावी.
मागण्यांचा विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही असोसिएशनने या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.