लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी एस.टी. वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती. निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मार्ग शोधत असतानाच महामंडळाने मालवाहतुकीसाठी परवानगी दिली. यावर्षी पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. एस.टी.साठी अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासी भारमान घटल्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मात्र, मालवाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाला दिलासा प्राप्त झाला आहे.
गतवर्षी जिल्ह्यात दि.२१ मेपासून मालवाहतुकीला प्रारंभ झाला. कोरोना कालावधीत आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असताना एस.टी.च्या मालवाहतूक गाडीतून पेट्यांची वाहतूक करण्यात आली. ५० मालवाहतूक बसद्वारे गेल्या अकरा महिन्यांत ४ लाख ७८ हजार किलोमीटर प्रवास झाला असून, त्याद्वारे दोन कोटी २७ लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एस.टी.ने माल वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू झाली. एस.टी.च्या विश्वासार्हतेमुळे कारखानदार, व्यापारी, शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कोरोनाचे संकट असतानाही चालक- वाहक प्रवासी वाहतूक करीत आहेत. भारमान घटल्याने बहुतांश मार्गावरील फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस भारमान कमी झाल्याने जेमतेम ८ ते ९ टक्क्यांपेक्षा कमी फेऱ्या सुरू आहेत.
अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी लॉकडाऊनपूर्व एस.टी.च्या दैनंदिन ६०० गाड्या धावत असल्याने ४ हजार २०० फेऱ्यांमुळे एक लाख ८० हजार किलोमीटर वाहतूक सुरू होती. प्रवासी संख्या दोन ते सव्वादोन लाखांच्या घरात असल्याने ४८ ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत असे. मात्र, आता सध्या ४५ ते ९५ इतक्याच गाड्या धावत आहेत. त्यामुळे ८८ हजारांपासून चार ते साडेचार लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत आहे. जेमतेम चार ते पाच टक्के प्रवासी वाहतूक सुरू आहे. प्रवासी संख्या घटल्यामुळेच महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी मालवाहतुकीमुळे तेवढाच दिलासा प्राप्त होत आहे.
मालवाहतुकीमुळे एस.टी.ला चांगला प्रतिसाद लाभत असल्याने मालवाहतूक ५० गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीसोबतच आता जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक सेवा सुरू झाली आहे.
मे महिन्यापासून मार्चपर्यत रत्नागिरी विभागातून मालवाहतुकीमुळे मिळालेले उत्पन्न व किलोमीटर (प्रवास) पुढीलप्रमाणे-
महिना किलोमीटर उत्पन्न
मे २,००० ५७,०००
जून २२,००० ०६.८४
जुलै ५००० १९.११
ऑगस्ट ३८,००० १५.६४
सप्टेंबर ३७,००० १५.६४
ऑक्टोबर ७३,००० ३३.४९
नोव्हेंबर ४२,००० २५.१९
डिसेंबर ५१,००० २३.७७
जानेवारी ७८,००० ३८.९७
फेब्रुवारी ५९,००० २९.३९
मार्च २६,००० २०.५९
एकूण ४,७८,००० २२७.८५
कोट घ्यावा :
आंब्यापेट्यापासून मालवाहतूक सुरू झाली. त्यानंतर चिरा, सिमेंट, वाळू, खत, पाइप, पत्रे, साखर, रोपे आदी विविध प्रकारच्या वस्तूंची वाहतूक सुरू आहे. मालवाहतुकीसाठी कारखानदार, उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. पाच मालगाड्यांपासून सुरुवात झाल्यानंतर आता मालवाहतुकीच्या गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
-सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी