राजापूर : पर्यटकांचा ओढा कोकणात वाढावा यासाठी शासनाकडून होत असलेले प्रयत्न कसे तोकडे आहेत ते पुढे आले आहे. शासनाच्या ‘ब’ वर्गात सामाविष्ट असलेल्या आंबोळगड या निसर्गरम्य गावाला आजही अनेक प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे पर्यटक येतात पण सुविधांच्या अभावामुळे त्यांना पर्यटनाचा आनंद काही लुटता येत नाही, हे वास्तव अधोरेखीत झाले आहे.राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गरम्य परिसरात आंबोळगड वसले असून, गावाला लाभलेला विस्तीर्ण सागरकिनारा हाच खऱ्या अर्थाने पर्यटकांना मोहून टाकतो. नाटे महसुली गावाच्या हद्दीत समावेश होणाऱ्या आंबोळगडची लोकसंख्या साधारणत: हजारच्या आसपास आहे. निसर्गाने या परिसराला भरभरुन दिले आहे, पण शासनाकडून येथील सोयीसुविधांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील जनतेला उपजीविकेसाठी मुंबईसह अन्यत्र जावे लागते. त्यामुळे आज गावाची लोकसंख्या खूपच कमी असून, त्याचे परिणाम येथील शाळांवर जाणवतात. विद्यार्थी संख्या कमी असल्याने तेथील शाळाच बंद करण्याची पाळी आली होती. आंबोळगड गाव हा पर्यटनात्मकदृष्ट्या शासनाच्या ‘ब’ वर्गात सामाविष्ट असून, याठिकाणी लाभलेला समुद्रकिनारा हा खऱ्या अर्थाने पर्यटकांना खुणावत असतो. हा बीच धोकादायकही नाही.आंबोळगडला मोठा सागरकिनारा लाभला आहे. तसेच गगनगिरी महाराजांचा आश्रमही या गावात आहे. पर्यटन स्थळात समावेश असल्याने या गावाला ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या, त्या मात्र अजूनही मिळालेल्या नाहीत. प्राथमिक सुविधांची तर येथे वानवाच आहे. देशी - विदेशी पर्यटकांचा ओढा सातत्याने या गावाकडे असतो. पण इथे आल्यानंतर पर्यटकांसाठी निवास सुविधा उपलब्ध नाही. समुद्रकिनाऱ्यावर एक छोटेसे हॉटेल आहे. पण त्याला मर्यादा आहेत. याठिकाणी जादा खोल्या निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र टुरिझम मंडळाची परवानगी नाही. पर्यटनासाठी गावात आलेला पर्यटक हा कुठे ना कुठे स्थानिकांच्या घरीच वस्ती करतो. आंबोळगडमधून कुठेही मोबाईलवरुन संपर्क करायचा म्हटले तर याठिकाणी पुरेशी रेंज नाही. कारण नाटे- जैतापूर परिसरात असलेल्या विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरवरुन आंबोळगड येथे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना असुविधेचा सामना करावा लागतो. आंबोळगड गाव हा सीआरझेड खाली येतो. त्यामुळे नवीन घर बांधणीचे अधिकार हे स्थानिक ग्रामपंचायतीला नाहीत. त्यामुळे परवानगीसाठी तालुका पातळीवर यावे लागते. आजवर निर्माण झालेल्या सर्व समस्यांचा परिणाम हा आंबोळगडच्या विकास प्रक्रियेवर होत आहे. एकीकडे शासनाने आंबोळगडला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असताना दुसरीकडे गावातील प्रलंबित अनेक समस्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी शासन पार पाडत नाही, हेच सत्य आता पुढे आले आहे. निदान आतातरी शासनाने आंबोळगडच्या विविध समस्या सोडवाव्यात व या पर्यटन स्थळाला उर्जीतावस्था द्यावी, अशी आग्रहाची मागणी आंबोळगड ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
‘ब’ वर्गातील पर्यटनस्थळी असुविधा
By admin | Published: June 06, 2016 11:54 PM