वाटूळ वार्ताहर : तालुक्यातील पूर्व विभागातील ग्रामीण भागामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून वीजपुरवठा अनियमितपणे होत असून, त्यामुळे होत असलेल्या गैरसोयीबाबत पंचायत समितीचे दत्ताजी कदम यांनी महावितरण कार्यालयात निवेदन दिले.
गेले कित्येक महिने तालुक्यातील पूर्व विभागात सातत्याने वीज खंडित होत असल्याने घरगुती वापरात येणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये बिघाड होत आहे. मागील काही महिन्यांत तौक्ते वादळ, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत आहे. विजेची बिले वाढीव येत असल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यापूर्वीही त्यांनी याबाबत निवेदन दिले होते. परंतु, महावितरण कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसानभरपाई देण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही व वीजपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी करण्यात आलेली दुरुस्ती, उपाययोजना याबाबत सविस्तर तपशीलवार माहिती मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकारांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अन्यथा विजेच्या या सततच्या लपंडावामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली तर त्याला पूर्णपणे महावितरण अधिकारी जबाबदार राहील, असे या निवेदनात नमूद आहे.