चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी गावाला सध्या वायरमन उपलब्ध नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक वीज गेल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेजारील गावातील वायरमनला बाेलवावे लागत आहे. महावितरणने याची दखल घेऊन मिरजोळी गावाला तत्काळ वायरमन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच गावातील पथदीपही बंद असल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडत रहावे लागत आहे. एखादे वादळ आल्यास अथवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास वीजवाहिनीवर फांदी पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. अशावेळी शेजारील गावातील वायरमनला पाचारण करून वीजपुरवठा सुरळीत करावा लागत आहे. वायरमन नसल्याने वीजखांबावरील बंद दिवेसुद्धा बदलता येत नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण गावामध्ये अंधार असतो. मिरजोळी हे गाव शहरालगत असूनही या गावासाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी स्वतंत्र वायरमन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मिरजोळी ग्रामस्थांमधून होत आहे.