रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीला व संशोधनवृत्तीला वाव देण्यासाठी अभ्यासजत्रा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत शहरी, ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत अध्ययन समृद्धी कार्यक्रम प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. अभ्यासजत्रा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावर विविध संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या बौद्धीक पातळीबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये गणित व भाषा या विषयांमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धीक पातळीत वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. अहवालाचा आधार घेऊनच सर्वशिक्षा अभियानांतर्गत अभ्यास जत्रेद्वारे विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे आकलन करुन देण्याचा मानस आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच सर्व प्राथमिक शाळांमध्ये अभ्यास जत्रा उपक्रम राबविण्याची सक्ती शासनाने केली आहे. या उपक्रमांतर्गत विविध विषयांची दालने त्यावरील सादरीकरण, शाळेमध्ये शिकविलेल्या विषयांवर उपलब्ध साहित्यांच्या आधारे सादरीकरण केले जाणार आहे. मराठी, इतिहासातील अभिवाचन, भूगोलातील नकाशाचे वाचन याद्वारे देश व जगाची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. कृतियुक्त शिक्षण अध्ययन पद्धती, रचनावाद या माध्यमातून स्वयंअध्ययन करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. राज्यात प्रथमच अभ्यासजत्रेचे आयोजन करण्यात आले असून, जानेवारी ते मार्च २0१५ अखेर हा कार्यक्रम सर्वत्र राबविण्यात येणार आहे. शिक्षणोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
चौकसबुद्धी वाढवण्यासाठी ‘अभ्यासजत्रा’
By admin | Published: September 11, 2014 9:46 PM