रत्नागिरी : लसीकरणाची संख्या वाढविण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरण केंद्रे वाढविण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रे, काही प्राथमिक केंद्रे तसेच सात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेवक यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या १५ हजार लोकांची यादी पाठविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी कोविशिल्ड या लसचे १६ हजार ३०० डोस शासनाच्या आरोग्य विभागाकडून पाठविण्यात आले होते. सुरुवातीला लस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासह दापोली, कामथे आणि कळंबणी या तीन उपजिल्हा रुग्णालये आणि प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण आरोग्य केंद्र अशा १३ ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू झाली.
१ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी (कोमाॅर्बिड) असलेल्या व्यक्तींनाही लस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लसीकरणाचाही साठा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील लसीकरणाच्या केंद्रात वाढ करून सरकारी रुग्णालये ५६ आणि खासगी रुग्णालये सात अशा एकूण ६३ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे.
या सर्व केंद्रांवर दर दिवशी २५०० जणांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयात लस मोफत दिली जात असून, खासगी रुग्णालयांमध्ये २५० ररुपये आकारले जात आहेत. मात्र, लसीकरणाच्या टक्केवारीत अजूनही म्हणावी तशी वाढ झालेली दिसत नाही. लोक लस घेण्याबाबत अजूनही उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयासह ३८ आरोग्यकेंद्रे, १४ ग्रामीण रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालये आणि सात खासगी रुग्णालये अशा ६३ रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे.
चौकट
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १५,७७३ जणांची यादी तयार होती. त्यापैकी ९४२२ जणांनी लस घेतली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महसूल विभागातील १०२० जणांची, तर पोलीस विभागातील १७१७ जणांची यादी लसीकरणासाठी पाठविण्यात आली. मात्र, यापैकी केवळ २३ टक्के कर्मचाऱ्यांनीच लस घेतली. सुमारे साडेपाच हजार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे.
चौकट
कोरोना लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीत अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेऊन आता शासनाच्या पोर्टलबरोबरच थेट केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येत आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.