लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : अपुरी उपलब्ध होणारी लसीची संख्या वादाचा मुद्दा ठरत आहे. ज्या संख्येच्या तुलनेत पहिले डोस उपलब्ध झाले. त्याच्या सरासरीने लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी संगमेश्वर पंचायत समिती सभापती जया माने यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन लसीची संख्या वाढवावी अशी आग्रही मागणी केली.
तसेच संगमेश्वर तालुक्यातील काही गावे कोरोना हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे या गावात सभापती जयसिंग माने यांच्या मागणीनुसार डोस उपलब्ध झाले होते. त्याप्रमाणे दुसऱ्या डोससाठी लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार विनायक राऊत, मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. ते यावर ताेडगा काढतील, असा विश्वास जयसिंग माने यांनी व्यक्त केला आहे.