राजापूर : काेरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तीन ते चार दिवस कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी होत नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती बिनदिक्कत फिरत असतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर तत्काळ कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी संबंधित ग्रामपंचायतींनी करावी, अशी मागणी धोपेश्वर येथील दीपक गुरव यांनी केली आहे.
गावांमध्ये काेरोना रुग्ण सापडल्यानंतर ते घर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी केली जाते. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर लगेचच कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र, सद्य:स्थितीत काही ग्रामपंचायतींकडून तीन ते चार दिवस कंटेन्मेंट झोनचा फलकही लावला जात नसल्याचे दिसत आहे.
त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती बिनदिक्कतपणे फिरत असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण जर होम आयसोलेशनमध्ये असेल तर त्याची तशी व्यवस्था आहे की नाही ते पाहण्याचे कष्टही ग्रामपंचायत, सरपंच अथवा आरोग्य विभागाकडून घेतले जात नसल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. होम क्वारंटाईनची व्यवस्था नसेल तर शाळांच्या इमारती क्वारंटाईनसाठी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही गुरव यांनी केली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर तो परिसर निर्जंतुकीकरण करावे, याकरिता ग्रामनिधीचा वापर करावा, अशी मागणीही गुरव यांनी केली आहे.