रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २०१८ या वर्षात २०१७च्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. अत्यंत कडक स्वरुपाचे कायदे असतानाही बलात्कारांच्या संख्येत झालेली ही वाढ चिंताजनक आहे. मात्र, जिल्ह्यातील पोलिसांनी २०१८मधील बलात्काराचे सर्व गुन्हे उघड केले आहेत. तसेच जिल्हा पोलिसांनी केलेल्या जनजागृतीमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात २०१७पेक्षा २०१८ मध्ये घट झाली आहे.गुन्हेगारांना कडक शासन करणारे कायदे प्रभावीपणे वापरले जात असल्याने व जनतेलाही तक्रारी दाखल करण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे याआधी गुन्हे दाखल करण्यास घाबरणाऱ्या पीडितांना बळ मिळाले. कोणालाही न घाबरता झालेल्या अन्यायाबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी आॅनलाईन व वॉट्सअॅपचे नंबरही पोलीस खात्याकडून देण्यात आले. सर्वच महत्त्वाच्या पोलीस स्थानकात येणाºयांना गुन्हे दाखल करण्याबाबत मार्गदर्शन करणारे कक्षही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळेच भीतीपोटी दाखल न होणारे गुन्हेही आता निडरपणे दाखल करण्यास पीडित पुढे येत आहेत.सन २०१७मध्ये जिल्ह्यात बलात्काराचे ४७ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ४६ गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, २०१८मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये २०१७पेक्षा ९ गुन्ह्यांनी वाढ झाली. २०१८मध्ये बलात्काराचे ५६ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले. हे सर्व गुन्हे त्याच वर्षी उघडकीस आले. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी चांगल्या प्रकारे केलेले काम यामुळेच हे शक्य झाले. अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना न्यायालयात कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून अधिक प्रभावीपणे पुराव्यांची मांडणी व्हावी, ही जनतेची अपेक्षा आहे.सन २०१८मध्ये २०१७ च्या तुलनेत विनयभंगाचे गुन्हे कमी झाले आहेत. २०१७मध्ये विनयभंगाचे १०६ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ९६ गुन्ह्यांचा तपास झाला. २०१८मध्ये विनयभंगाचे ७८ गुन्हे दाखल झाले व त्यातील ७७ गुन्ह्यांचा म्हणजेच शंभर टक्के तपास झाला. सन २०१८मध्ये रत्नागिरीत जे बलात्काराचे ५६ गुन्हे घडले त्यामधील १५ बलात्काराचे गुन्हे हे लहान मुलींवरील आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये बाजू मांडण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बलात्काराच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:47 PM