रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी शासकीय निर्बंध शिथिल असल्याने यावर्षी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले आहेत. पाच दिवसांच्या गाैरी-गणपती विसर्जनानंतर अनेक मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागले आहेत. परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे व एस.टी. ने जादा गाड्यांची व्यवस्था उपलब्ध केली आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी तब्बल १ लाख ९१६ मुंबईकर गावी आले होते. यामध्ये रेल्वेद्वारे ३१०९०, बसद्वारे २४८५८, खासगी वाहनातून २२,२९९, खासगी आराम बसने २२,६६९ लोक आले आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी ११०० एस. टी. बसेस मुंबईतून दाखल झाल्या हाेत्या. गणेशोत्सवात दि. १४ सप्टेंबरपासून ते दि.२२ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्याचे नियोजन रत्नागिरी विभागातून करण्यात आले आहे. आतापर्यंत ९९९ जादा गाड्यांचे आरक्षण झाले असून, त्यामध्ये २१५ ग्रुप बुकिंगच्या गाड्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ९६९ गाड्या मुंबईला रवाना झाला आहेत. उर्वरित ३० गाड्यांचे नियोजन दि.२२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर सध्या दिवसाला ५० गाड्या धावत असून, गणेशोत्सवासाठी दि. ६ ते २५ सप्टेंबरपर्यंत विशेष २६४ गाड्या फेऱ्या धावत आहेत. दिवा-सावंतवाडी व दादर रत्नागिरी या दोन पॅसेंजर आरक्षित गाड्या सुरू केल्या आहे. या दाेन्ही गाड्यांना सर्व स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या आरक्षित असल्याने डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी हाेत नाही. मांडवी, कोकणकन्या स्पेशल गाड्यांना जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
----------------------
रत्नागिरी विभागाने यावर्षी प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांच्या गावी एस.टी.ची उपलब्धता केली होती. त्यानुसार २३० गाड्या गावातील मुंबईकरांसाठी सोडण्यात आल्या. एस.टीच्या या उपक्रमामुळे मुंबईकरांची गैरसोय दूर झाली.
------------------------
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर २५३ फेऱ्या सोडण्यात आल्या असून, परतीसाठी विशेष १० गाड्यांचे नियोजन केले आहे. सर्वच विशेष गाड्यांचे आगाऊ आरक्षण असल्याने मुंबईकरांना तातडीचे तिकीट मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे एस. टी. व खासगी आराम बसच्या गाड्यांना गर्दी होत आहे.
--------------------
मास्कबरोबर दोन्ही लसीकरण झालेल्यांचा युनिव्हर्सल पास, ७२ तासांपूर्वी कोरोना चाचणी केले असल्याचे प्रमाणपत्र या गोष्टी सक्तीच्या होत्या. मात्र, एस.टी.मध्ये मास्क सक्तीचा होता; परंतु लसीकरणाची मात्रा, कोरोना प्रमाणपत्राची सक्ती नसल्याने एस.टी.ला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लाभला.