एसटी बंद
राजापूर : राजापूर-गोवळ-बुरंबेवाडी मार्गावर पन्हळे येथील मोरी अतिवृष्टीत खचल्याने यामार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंधरा दिवस उलटूनही मोरीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.
नेटवर्कअभावी गैरसोय
रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी, खालगाव पंचक्रोशीमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भारत संचार व खासगी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क गायब असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गेले आठ ते दहा दिवस नेटवर्कअभावी शासकीय, बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
वृक्षारोपण कार्यक्रम
दापोली : कृषिदिनाचे औचित्य साधून गिम्हवणे - दुबळेवाडी येथे दापोली कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिम्हवणे दुबळेवाडी पासष्टतील स्मशानभूमीत वृक्षलागवड करण्यात आली. वड, काजू, बकुळ, चाफा या वृक्षांची लागवड करण्यात आली.
बासष्ट फेऱ्या सुरू
लांजा : अनलाॅकनंतर एसटीची आंतरजिल्हा व ग्रामीण मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लांजा आगारातून दिवसाला ६२ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. कल्याण, मुंबई, अक्कलकोट या मार्गावरील फेऱ्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
तेली समाजाकडून निवेदन
रत्नागिरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक इम्पिरिकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा. ओबीसीची जातिनिहाय जनगणना करून आरक्षणाचा कायदा संमत करावा या मागणीसाठी जिल्हा तेली समाजातर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
उमेश मोहितेचे यश
रत्नागिरी : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया जिल्ह्यात राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वरचित ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेत उमेश मोहितेंची कविता उत्कृष्ट ठरली आहे.
कृषी सप्ताहाची सांगता
दापोली : महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता झाली. कात्रण, दमामे, तामोंड, भडवळे गावांमध्ये विविध कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. बीजप्रक्रिया, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा वापर, काळा भात, काजू, हळद लागवडीबाबत माहिती देण्यात आली.
पीकविमा योजनेची जनजागृती
रत्नागिरी : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना जनजागृती मोहिमेचा आरंभ करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी पीकविमा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
नांदळज येथे वृक्षारोपण
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नांदळज येथे ग्रामदेवता श्री सुखाईदेवी मंदिर परिसरात शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, वनविभाग परिमंडल देवरूख, ग्रामपंचायत नांदळल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.