रत्नागिरी : जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग पाहून लसीकरणाला अजून वर्षभर लागू शकते़ त्यामुळे पुढील तीन महिन्यांत केंद्र वाढवून लसीकरण पूर्ण करणार का, याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे़
बाळ माने म्हणाले की, हे मंत्री, खासदारांसह जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेत आहेत. ते तिथे फोटोग्राफीचे छंद जोपासत असून ते फोटो छापूनही आणत आहेत, हा बालिशपणा आहे. अशामुळे कोविडच्या कठीण काळात तुमची करमणूक होत असेल, पण ही गोष्ट हास्यास्पद आणि दुर्दैवी आहे, असे त्यांनी म्हटले आहे़
रत्नागिरी जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटात सुमारे ६ लाख लोकसंख्या आहे. ४५ च्या वर साडेचार लाख व ० ते १७ यामध्ये अंदाजे ४ लाख लोकसंख्या आहे. राज्य सरकारने काल (दि.७) १८ ते ४४ वयोगटातील जिल्ह्यातील १२ हजार लोकांना लस दिली. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरातील विशेष लसीकरण केंद्र अशी सर्व ८४ केंद्र आहेत. म्हणजे एका केंद्रात किमान १५० ते २०० लसीकरण झाले आहे. या गतीने लसीकरण झाले तर पहिला व दुसरा डोस मिळायला पुढचे सहा महिने जाणार आहेत, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे बाळ माने म्हणाले़
रस्ते मंजूर करण्यासाठी हेच मंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जातात. मग आणखी लस, केंद्र याच्या मागणीसाठी केंद्राकडे का जात नाहीत? तिथून कोटा आणा, त्याकरिता मदत लागणार असेल तर मला संपर्क साधा, असे बाळ माने यांनी सांगितले.