लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : तालुक्यात सोमवारी (१२ जुलै) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाल्याने दुपारपर्यंत तालुक्यातील भारजा, निवळी नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील अडखळ येथे पावसाने पूर्णतः घर कोसळून एक महिला जखमी झाली आहे. या घराचे ४७,९०० रुपये तर दुधेरे येथे झाडावर वीज कोसळून झाडाशेजारी असलेल्या घरातील इलेक्ट्राॅनिक वस्तूंचे ४६ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. मंडणगड शहरानजीक असलेल्या भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहानजीक नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन या पाण्याचा प्रवाह राष्ट्रीय महामार्गावर आला हाेता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. काहीजण या मार्गावरून धोका पत्करून वाहतूक करत होते. मुख्य रस्त्यापासून याच नाल्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या समर्थ नगराचा पाणीपातळी वाढल्याने तालुक्याशी पूर्णतः संपर्क तुटला.
दरम्यान, भारजा नदीवरील कुंबळे - तिडे मार्गावर असलेला पूल पाण्याखाली गेल्याने तिडे, तळेघर या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. भोळवली गावानजीक असलेल्या लाटवणमार्गे महाड या मार्गावरील पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक काही काळ खोळंबली आहे. चिंचघर - मंदिवली पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे जावळे, आंबवली, वेळास मार्ग बंद झाला आहे. चिंचघर - शेवरे मार्गावर मोरीवरून पाणी गेल्याने येथील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पावसाचा जाेर कायम राहिल्याने तालुक्यात सातत्याने वीज गायब हाेत हाेती.
----------------------------------
भिंगळाेली - समर्थनगर रस्त्यावर पाणी
भिंगळोली समर्थनगर येथील रस्त्यावर पाणी आल्याने काही घरांचा संपर्क तुटला आहे तर राष्ट्रीय महामार्ग आंबवडे ते राजेवाडी मार्गावर एस. टी. डेपो ते पंचशील नगर दरम्यान पाणी भरल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. तालुक्यात रविवारी एकूण पावसाची नाेंद ६१० मिलिमीटर इतकी तर सरासरी १५२ मिलिमीटर झाली आहे. मंडणगडमध्ये १४० मिलिमीटर, म्हाप्रळ ११०, देव्हारे १८०, वेसवी १७९ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.
-----------------------------------------
मंडणगड शहरानजीक असलेल्या भिंगळोली गावातील समर्थनगर येथे ओढ्याला पाणी येऊन येथील घरांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला. (छाया : प्रशांत सुर्वे)