लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या वर्षापासून कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. पहिल्या लाटेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. आता दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांच्या संख्येबरोबरच मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने रुग्ण आणि त्यांचे नातवाईकच नव्हे, तर सर्वच घटकांमध्ये कोरोनाच्या भीतीबरोबरच मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणावर बिघडले असून सर्व घटकच वेगळ्या तणावाखाली जगत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वेगळीच परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. वृद्धांमध्ये अधिक प्रमाणावर भीती आहे. त्याचबरोबर या लाटेने ४० वर्षांवरील व्यक्तींमध्ये अधिक नैराश्य आले आहे. कोरोना झाला तर काय होईल, माझ्या पश्चात काय हाेईल, नोकरी-व्यवसाय असणाऱ्यांना तर नैराश्येने अधिकच ग्रासले आहे. प्रत्येक आतून चिंता आणि नैराश्य याने पोखरला गेला आहे.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती बदलणार आहे, अशी सकारात्मकता बाळगत प्रत्येकाने योग्य खबरदारी घेऊन दिनचर्या सुरू ठेवल्यास चिंता दूर ठेवता येईल.
सर्वच घटक तणावाखाली...
सध्या प्रत्येकाची भीती वेगवेगळी आहे. काहींचे जाॅब दावणीला आहेत. व्यवसाय ठप्प. किती दिवस ही परिस्थिती राहील माहीत नाही. सामान्य लोकांना कोरोना होईल का याची, तर झालेल्यांना आपण यातून बाहेर पडू ना, ही भीती, तर त्यांच्या नातेवाइकांना स्वत:ची आणि रुग्णाची भीती वाटते.
हतबलता झटकून रूटीन चालू ठेवायला हवे
कोविड काळात सर्वांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मानसोपचार तज्ज्ञ यांनी एकत्र येत ‘रत्नागिरी असोसिएशन ऑफ मेंटल हेल्थ, प्रोफेशनल्स’ नावाने संघटन करीत ‘सुकून’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे.
कोविड योद्धे असलेले डाॅक्टर्स आणि परिचारिका त्याचबरोबर कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक टोकाच्या तणावाला सामोरे जात आहेत. त्यांना ‘सुकून’ या उपक्रमाच्या माध्यमातून दिलासा आणि मनोधैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
‘सुकून’च्या माध्यमातून मानसोपचार तज्ज्ञांचा गट मनारोग्यावर प्रशिक्षण तसेच वेबिनार यांच्या माध्यमातून अशा व्यक्तींना दिलासा आणि मनोधैर्य देण्याचा प्रयत्न करणार आहेत. काहीवेळा प्रत्यक्ष कार्यशाळा, तर काहीवेळा डिजिटल स्वरूपाच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. काही ठिकाणी याची सुरुवातही झाली आहे.
सध्या लोकांची अवस्था कैद्यासारखी झाली आहे. प्रत्येकजण आतून चिंतेने ग्रासलेला आहे. नोकरीचे, व्यवसायाचे काय, या भीतीपोटी प्रचंड नैराश्य, हतबलता आलेली आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर हे ब्रेक करायला हवं. भले क्वारंटाईन असा, आयसोलेटेड असा रूटीन चालू ठेवायला हवे. जीवनाला गती द्यायला हवी, त्यासाठी नवीन काय करू शकतो, हे शोधा. अनावश्यक भीती बाळगून भविष्यात काळोख आणण्यापेक्षा टापटीप, प्रसन्न राहा. ही परिस्थिती बदलणारच आहे, हे लक्षात घ्या.
- डाॅ. कृष्णा पेवेकर, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.
गेला महिनाभर कोरोनाचा भडका उडाला आहे. टी. व्ही., सोशल मीडियावरील बातम्या वाचताना, पाहताना छातीचे ठोके वाढणारच, राजकीय वातावरणही अनुकूल वाटत नाही. पहिल्या लाटेत जीवितहानी नव्हती, दुसरीत लक्षणीय आलेख वाढतोय. ज्येष्ठांमध्ये भीती, मुलांमध्ये वेगळीच चिडचीड, कमावते आहेत, त्यांनाही कोरोनाबरोबरच भविष्याची चिंता आहे. मात्र, एकमेकांच्या सहकार्याने सावरण्याचा प्रयत्न सर्वत्र होतोय, हीच सकारात्मक बाब आहे. प्रत्येक मने सावरण्यासाठी समुपदेशानाची गरज महत्त्वाची.
- डाॅ. श्रृतिका कोतकुंडे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.
मानसोपचार तज्ज्ञ, चिपळूण
सध्या लाॅकडाऊनच्या काळात प्रत्येकाची भीती वेगवेगळी आहे. काहींची नाॅर्मल, तर काहींची टोकाची. यातून बाहेर पडण्यासाठी कोरोनाविषयक खबरदारीचे पालन करणे, गर्दी टाळणे, परिस्थिती स्वीकारून तिच्याशी जुळवून घेणे. प्रक्षोभक, भडक, भावनेला हात घालणाऱ्या बातम्या न पाहाणे, ज्यांना कोरोना झालाय किंवा ज्यांना भीती वाटतेय, त्यांनी आहार, निद्रा यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शारिरीक, सामाजिक, भावनिक, मानसिक बळ आणि उत्साह मिळविण्यासाठी सकारात्मक राहाणे गरजेचे.
- डाॅ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.