जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राला रत्नागिरीतून गुरुवारी कोरोना लसीच्या ४० कोव्हिशिल्डच्या मात्रा पुरविण्यात आल्या होत्या. मात्र, टोकन देणे व प्रत्यक्ष रजिस्टरमधील नाव-नोंदणीमुळे लाभार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आणखी वीस डोस रत्नागिरीतून तातडीने मागविण्यात आले.
लसीसाठी लाभार्थ्यांनी जाकादेवी आरोग्य केंद्रात सकाळी लवकर येऊन टोकन घेणे की नागरिकांनी आरोग्य केंद्रात स्वतः येऊन वहीत नाव नोंदविणे याबाबत वैद्यकीय अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी बाहेरील सूचना फलकावर स्पष्ट लिहावे, असे आवाहन खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला केले आहे.
जाकादेवी आराेग्य केंद्रात गुरुवारी कोव्हिशिल्डच्या सुमारे ६० लसीच्या मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. लसीकरणासाठी टोकन देणे आणि रजिस्टरमध्ये नाव नोंदणी करणे अशा दोन्ही पद्धतीचा अवलंब या केंद्रात केल्याने लसीकरण थोड्या उशिराने सुरू झाले. लसीकरणाचे याेग्य नियाेजन करण्याची मागणी खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर रामगडे, पोलीस पाटील प्रकाश जाधव यांनी केले आहे.
.................................................
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांसह लाभार्थी उपस्थित हाेते.