रत्नागिरी : विमाने उतरण्यासाठी रत्नागिरीतील विमानतळ पुरेसे आहे. मात्र विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. ही जागा ताब्यात येईपर्यंत काही जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. अजून ५० एकर जागेची त्यासाठी गरज असून, खास बाब म्हणून त्याला अधिक दर मिळावा, असा प्रस्ताव संबंधितांकडे पाठवण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.
मंत्री सामंत यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे विमानतळाच्या कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सर्व प्रांताधिकारी, तटरक्षक दलाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आणि ग्रामस्थही उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी ही माहिती दिली.
विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्णत्त्वाला गेले आहे. येथे विमान उतरू शकते. मात्र विमानाच्या पार्किंगसाठी अधिक जागेची गरज आहे. सध्या पाच हजार रुपये गुंठा इतका दर दिला जात आहे. तो खूपच कमी आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी दीपक कपूर यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. खास बाब म्हणून जागेचा अधिक मोबदला देण्याचा प्रस्ताव आपण पाठवत आहोत. त्याला नक्की मंजुरी मिळेल. अर्थात ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत विमानतळाचे काम अडू नये, यासाठी काही जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आपल्याकडून सुरू असून, लवकरच विमान वाहतूक सुरू व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.