खेड : शहरासह ग्रामीण भागात आता कोरोना बाधितांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. परंतु याचबरोबर प्रशासनाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु काही नागरिक याकडे कानाडोळा करीत असून विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
लोकवर्गणीतून स्वच्छता
दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनारा लोकवर्गणीतून स्वच्छ करण्याचे काम स्थानिक नागरिकांनी सुरु केले आहे. सामाजिक कार्यकर्ते किशोर केळसकर आणि राजेश जैन आदींनी आंजर्ले येथील समुद्राचे मुखद्वार असलेल्या तरी बंदर परिसरात गेल्या काही दिवसांपासून लोकवर्गणीतून स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
भात शेतीला फटका
आवाशी : गेल्या दीड - पावणेदोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. तशातच सातत्याने येणारी वादळे, अतिवृष्टी, महापूर याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने संकट उभे केले आहे. भात शेती पसवू लागली असतानाच पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शेती हातची जाणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
संसारोपयोगी साहित्य
चिपळूण : जुलै महिन्यात झालेल्या महापुरात चिपळूण मधील अनेकांची घरे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना ठाणे येथील जनहित फाउंडेशनच्या वतीने संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी खेर्डी येथील ग्रामस्थांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या वितरण कार्यक्रमावेळी जनहित फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर
दापोली : बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. डेरवण येथील डॉ. नेहा पाटील आणि त्यांचे सहकारी रक्त संकलनासाठी उपस्थित होते. या शिबिरात १६ जणांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप तांबे, विधानसभा केंद्राध्यक्ष ज्ञानरत्न जाधव, विरेंद्र येलवे, सुशांत मोहिते, आतीष घाडगे आदी उपस्थित होते.