चिपळूण : आजकाल औद्योगिक विकास खोळंबत चालला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत बोटावर मोजण्याइतके कारखाने उभे असून, काही व्यक्ती स्वार्थापोटी उद्योजकांवर दबाव टाकून फरफट करीत आहेत. त्यामुळे विकासाला आणखी खीळ बसत आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत गेली अनेक वर्षे उद्योजकांना वेठीस धरुन त्यांची गळचेपी करण्याचे काम सुरु आहे. पर्यायाने नवीन उद्योग येथे येत नाहीत. जे काही छोटे उद्योजक चार पाच वर्षांपूर्वी जागा खरेदी करुन पाय रोवू पाहात आहेत, त्यांना परत येताना असंख्य अडचणी येतात. त्यामुळे पाच पाच वर्षे प्लॉट खरेदी करुनही त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे. उद्योग विकास करण्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता येथे नाही. त्यामुळे दबावाचे राजकारण करुन अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न अधिक केला जातो. सीईटीपी प्रकल्पाचा बागूलबुवा काही लोक स्वार्थासाठी करीत आहेत. सीईटीपीचे भांडवल करुन आपली वैयक्तिक कर्ज कशी फेडता येतील, याची शक्कल लढवली जाते. चक्कीचे कर्ज, रिक्षाचे कर्ज, बँकांचे कर्ज, सीईटीपीने फेडावे, यासाठीही काही प्रयत्न करतात. यामुळे उद्योजक हैराण होतात. नियमात राहून काम करणे त्यांना शक्य नसते. याबाबत उलटसुलट दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध करुन आपली पोळी भाजण्याच्या नादात सर्वसामान्य माणसाचे व उद्योजकांचे नुकसान केले जात आहे. याबाबत शासनाने कठोर भूमिका घ्यावी व कथित पुढारी म्हणून मिरविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. उद्योजक जगला तरच औद्योगिक वसाहत जगेल व सर्वसामान्य कामगार जगेल, याचे भान ठेवायला हवे, अशी कामगारवर्गात चर्चा आहे. पोटासाठी काम करणाऱ्या कामगारांनाही याचा नाहक फटका बसत आहे. (प्रतिनिधी)
उद्योजकांवर राजकीय नेत्यांकडून वाढतोय दबाव
By admin | Published: January 01, 2015 10:17 PM