देवरूख : कामगार वर्गाच्या मजुरीबरोबरच, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे देवरूख परिसरातील चिरेखाण मालकांनी चिऱ्याच्या दरात वाढ केली आहे. याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चिरेखाण मालकांनी केले आहे.बांधकाम करण्यासाठी चिऱ्याचा वापर सर्रास केला जातो. नागरिकांना चिरा उपलब्ध करून देण्यासाठी देवरूख व परिसरातील चिरेखाण मालक सदैव कटिबध्द आहेत. मात्र दिवसागणिक पेट्रोल, डिझेल इंधनाचे दराचा चढता आलेख पहायला मिळत आहे. कामगार वर्गाची मजुरी वाढत आहे.
यामुळे चिरेखाण व्यवसाय न परवडणारा ठरत आहे. नाइलाजास्तव चिऱ्यांच्या दरांमध्ये वाढ करण्याचा एकमुखी निर्णय देवरूखसह साडवली,कोसुंब, निवे आदी गावातील चिरेखाण मालकांनी घेतला आहे.
एका लोडमागे ५०० रूपयांची वाढ करण्यात आली. याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पप्पू नाखरेकर, अरूण बने, राजू जाधव, श्रीआर जाधव, सुरू रसाळ आदींनी केले आहे.