देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले, महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेले शृंगारपूर गावातील ग्रामस्थ मंगळवारपासून रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीसमोरच उपोषणला बसले असले आहेत. उपोषणकर्त्यांची माजी आमदार सुभाष बने यांनी भेट घेऊन मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठेकेदार स्वत: येऊन ग्रामस्थांशी चर्चा करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शृंगारपूर, कातुर्डी ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे. नायरी ते शृंगारपूर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सन २०१८-१९ मध्ये मंजूर झाला होता. या जवळपास पाच ते सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाची निविदा निघाली होती.
हे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण करण्याची अंतिम मुदत असताना प्रत्यक्ष कामाला सुुरुवातच फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आली. रस्ता खोदून ठेवण्यात आला. काही ठिकाणी मोऱ्यांची अर्धवट कामे करण्यात आली. यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्व कामे ठप्प झाली.त्याआधी हे काम निकृष्ट सुरू असल्याची ओरड येथील ग्रामस्थांनी केली होती. वाळूऐवजी ग्रीटचा भुसा वापरण्यात येत होता. मात्र, अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. रस्ता खोदून ठेवल्याने पावसाळ्याभर कातुर्डी एस. टी. बंद होती. आता सारे सुरळीत झाले असताना अद्याप रस्त्याचे काम सुरू न झाल्याने येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.उपोषणाबाबतचे पत्र संबंधित विभागांना देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने आम्हांला हे उपोषण करणे भाग पडले असे शृंगारपूर ग्रामस्थांनी सांगितले आहे. रस्ता ही मुलभूत सविधा आहे. मात्र त्यापासूनच लोक वंचित असल्याने आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. किमान आता तरी या उपोषणाची दखल घेऊन रस्ताचे काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.