रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत मदत व बचावकार्य करणाऱ्या विविध संस्था व कोविड योद्ध्यांचा सत्कार पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंड, रत्नागिरी येथील ध्वजारोहण कार्यक्रमात करण्यात आला.
सर्वप्रथम स्वातंत्र्यसैनिक कमल मनोहर नामजोशी यांचा सत्कार पालकमंत्री परब यांच्या हस्ते झाला. जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत मदत व बचावकार्य करणाऱ्या रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, जिद्दी माऊंटेनिअर्स, देवरुखमधील राजू काकडे हेल्प ॲकॅडमी, कोल्हापूरची व्हाईट आर्मी, ठाणेतील नागरी संरक्षण दल, खेड रेक्सू टीम, खेडमधील विसर्जन कट्टा, दापोलीतील अनुबंध आपत्कालीन सेवा, गुहागरमधील टाकळेश्वर मच्छीमार सहकारी संस्था मर्या. अंजनवेल, वेलदूर मच्छीमार सहकारी संस्था मर्या. अंजनवेल, दापोली तालुक्यातील दाभोळवाडी मच्छीमार सहकारी संस्था मर्या. हर्णै, सुवर्णदुर्ग मच्छीमार सहकारी संस्था मर्या. हर्णै या संस्थांचा सत्कार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यात सलग २ वर्ष कठीण व खडतर सेवा केल्याबद्दल विशेष सेवा पदक देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहिमकुमार गर्ग व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वसंतराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे कोविड योद्धे म्हणून विकास विलास नाणीजकर, दर्शन बाबल्या देसाई, रोहन दिलीप सावंत, अजय मकवाना, परेश गणेश मयेकर तसेच रत्नागिरी नगर परिषदेतर्फे विजय जानू कांबळे, राजश्री राजेंद्र चव्हाण यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांमध्ये डेरवणच्या बी. के. वालावलकर हॉस्पिटलला सुवर्णपदक, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला रौप्यपदक, चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलला कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकामी मेहनत घेतल्याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश मोराडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व सर्वोत्कृष्ट तालुका (राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना)मध्ये प्रथम क्रमांकप्राप्त दापोली तालुका, द्वितीय क्रमांकप्राप्त खेड तालुका तर तृतीय क्रमांकप्राप्त चिपळूण तालुका यांना पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ग्राम दत्तक योजनेत २७ अधिकाऱ्यांनी ५२ गावे दत्तक घेतली. या योजनेंतर्गत आयोजित स्पर्धेत चांगली कामगिरी बजावलेले पोलीस अधिकारी व ग्रामस्थांचाही यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.