रत्नागिरी : मागील दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशी मागणी करून देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये गंभीरपणे लक्ष न घातल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा संपुष्टात येण्याची चिन्ह दिसू लागली होती. परंतु शिवसेनेने हा प्रश्न उचलून धरल्यामुळे आता कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. याबाबत शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी तातडीने बैठक बाेलावली आहे.
काही दिवसांपूर्वीच चिपळूण येथे झालेल्या मेळाव्यामध्ये आमदार राजन साळवी ह्यांनी समितीला आपण कोकणातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन यासंबंधी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते. आपले दिलेले आश्वासन पाळत आमदार राजन साळवी यांनी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळयासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. तत्पूर्वी कालच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याची एकमुखी मागणी केली होती.
या मागणीला अनुसरून आमदार राजन साळवी यांनी आज विधिमंडळामध्ये यासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित करून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यासमयी विनोद तावडे यांनी तात्काळ या मागणी संदर्भात एक विशेष समिती स्थापन केली व या समितीच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले व पुढील आठवड्यामध्ये समिती सदस्य व आमदार यांची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या दृष्टीने आमदार राजन साळवी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे हे संकेत मानले जात आहेत.