रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ५८४ शाखा डाकघरे संगणकीकृत केली जाणार आहेत. दर्पण (डिजिटल अॅडव्हान्समेंट आॅफ रूरल पोस्ट आॅफिस फॉर ए न्यू इंडिया) या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाखा डाकघरातील पोस्टमास्तरांना हँड डिव्हाईस देण्यात येणार असून, याद्वारे बचत बँकेची कामे केली जाणार आहेत. तसेच पुढच्या महिन्यात रत्नागिरीतही इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू होणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली.सध्याच्या स्पर्धेच्या युगात पोस्ट खातेही हायटेक होत आहे. या नवीन उपक्रमांची माहिती देण्यासाठी कोड्डा यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी सहायक डाकघर अधीक्षक जी. पी. तळगावकर, सतीश कामथे, गजानन करमरकर आदी उपस्थित होते.गतवर्षी २२ डिसेंबरपासून सीएसआय प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याने पोस्टाची कामे अधिक जलदगतीने होऊ लागली आहेत. मार्च २०१८पासून जिल्ह्यातील ५३ पोस्ट कार्यालयांमध्ये मोफत आधार नोंदणी तसेच माफक दरात दुरूस्ती किंवा बदल करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रत्नागिरी व चिपळूण येथे एटीएम सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बँकेच्या माध्यमातून सुमारे २३ सेवा ग्राहकांना दिल्या जाणार आहेत. रत्नागिरी, खेड, संगमेश्वर आणि लांजा येथील रेल्वे आरक्षणाचा लाभही ग्राहक घेत असल्याचे कोड्डा यांनी सांगितले.देशातील ६०० मुख्य शहरांमध्ये पेमेंट बँकविविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी डाक जीवन विमा योजना पूर्वीपासून होती. आता अगदी ग्रामीण भागातील जनतेसाठी ग्रामीण टपाल जीवन विमा ही योजना सुरू केली आहे. पोस्ट खाते आता बँकिंगच्या क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. देशात ६०० मुख्य शहरांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात येणार आहे. यात रत्नागिरीचा समावेश असून, शहरातील गाडीतळ येथील पोस्टाच्या मुख्य इमारतीत पुढील महिन्यापासून ही सुविधा सुरू होणार आहे.जिल्ह्यात पोस्टाचे १२ लाख ग्राहकरत्नागिरी जिल्ह्यात पोस्टाचे विविध प्रकारचे १२ लाख ग्राहक असून, त्यात गतवर्षीच्या एक लाख नवीन ग्राहकांचा समावेश आहे. जिल्ह्यात पोस्टाच्या ग्रामीण ५८४ शाखा असून, ७७ उपशाखा तर दोन मुख्य कार्यालये आहेत. रत्नागिरीतील सर्वच शाखा संगणकीकृत झाल्या तर भविष्यात विमा हप्ता स्वीकारणे, रजिस्टर पार्सल बुकिंग, मनिआॅर्डरचे पेमेंट आदी कामे केली जाणार आहेत.विविध योजनांना प्रतिसादग्राहकांना बचतीचा लाभ मिळवून देण्यासाठी पोस्टाने बचत बँक, आवर्ती ठेव, मासिक उत्पन्न योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, वरिष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र अशा अनेक योजना सुरू केल्या. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच १० वर्षे वयापर्यंतच्या बालिकांसाठी सुकन्या समृद्धी योजनाही पोस्ट खात्याने सुरू केली आहे. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.