राजापूर : शिलेदार संस्थेच्या गिर्यारोहकांनी कळकराई सुळका आणि ढाक किल्ला यांच्यामधील दरीमध्ये ७३ फूट भारतीय तिरंगा ध्वज फडकावला.
सह्याद्रीच्या दाट जंगलात ढाक किल्ल्याजवळ असलेला कळकराई हा अतिशय दुर्गम व १८० फुटांपेक्षा अधिक उंचीचा हा सुळका अत्यंत कठीण स्वरुपाचा आहे. या खडतर मोहिमेची आखणी करून शिलेदार गिर्यारोहण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माेहीम फत्ते केली.
शिलेदार संस्थेचे गिर्यारोहक सागर गोरुले (राजापूर), प्रीतम चौगुले (कोल्हापूर), महेश तेरदाळे (कोल्हापूर), अनिकेत जाधव (रत्नागिरी), मोनिष येनपुरे (पुणे), कविता बोटले (राजापूर), विनायक पुरी (पुणे), प्रीतेश गुडेकर (कोल्हापूर), रजनीकांत जाधव (सोलापूर), अमोल मुसळे (पुणे) हे या मोहिमेत सहभागी झाले होते.
शिलेदार संस्थेचे संस्थापक शिलेदार सागर नलावडे (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली त्याठिकाणी ७३ फूट तिरंगा दिमाखात फडकावला. एक वेगळी देशप्रेमाची ओळख यामुळे गिर्यारोहण क्षेत्रात झाली आहे.