रत्नागिरी : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते, मुळचे देवरुखचे असणारे कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के जी एन सरस्वती फाऊंडेशन यांनी सप्रे स्मृती जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा दि.३ व ४ जानेवारी रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला ‘चेसमेन रत्नागिरी’ तांत्रिक सहकार्य करणार आहे.रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित सप्रे स्मृती खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची बक्षिसे रोख रक्कम, आकर्षक चषक आणि पदक देवून सन्मानित करण्यात येणार आहेत. सप्रे भारतात १९५५ साली झालेल्या पहिल्या वहिल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते होते. याचसोबत त्यांनी १९५६ आणि १९६० साली झालेल्या जागतिक आॅलंम्पियाड स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेले सप्रे उत्कृष्ठ बुद्धीबळ विश्लेषक म्हणून ओळखले जात. ७० च्या दशकात त्यांनी ५ राष्ट्रीय निवड स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून काम केले होते.त्यांच्या या कार्याची दखल घेत चेसमेन आणि के जी एन सरस्वती फौंडेशन सप्रे स्मृती स्पर्धा २०१३ पासून आयोजित करत असून यावर्षी स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. कोरोना काळात हा वारसा सुरु ठेवावा म्हणून या स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.यंदा जलद व अतिजलद स्पर्धेत बक्षिसांची रेलचेल असून मुख्य बक्षिसांसोबतच १५, १३, ११, ०९, ०७ वर्षाखालील गट तसेच ज्येष्ठ नागरिक गट, उत्कृष्ठ दिव्यांग खेळाडू अश्या विविध प्रकारात खेळाडूंना प्रोत्साहनपर चषक, रोख रक्कम आणि मेडल्स ने सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दि. ३ फेब्रुवारी रोजी राणी लक्ष्मीबाई सभागृह येथे सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
रत्नागिरीत शनिवारपासून सप्रे स्मृती खुल्या बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन
By मेहरून नाकाडे | Published: January 31, 2024 1:55 PM