रत्नागिरी : रत्नागिरीच्या बहुचर्चित शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महिला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये मेडिकल कॉलेजच्या विविध विभागांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या वर्षीच्या एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी १०० मुलांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात ७९ मुलांचे प्रवेश झाले आहेत. दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. तर महाविद्यालयासाठी एकूण ३० डॉक्टर प्राध्यापकांपैकी सध्या ७ डॉक्टर मंजूर झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती; मात्र त्याला अपेक्षित राजकीय इच्छाशक्ती पुरेशी नव्हती. त्यामुळे हा विषय रेटला जात नव्हता; मात्र तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सध्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी रत्नागिरी मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी जोरदार इच्छाशक्ती प्रकट केली. एवढेच नाही, तर त्यासाठी वारंवार पाठपुरावाही सुरू केला.
त्यांच्या या प्रयत्नाला एकनाथ शिंदे यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. त्याला लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि मंजुरी मिळाल्या आहेत. महिला रुग्णालयाची इमारत, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय क्लब करून या कॉलेजच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.