रत्नागिरी : कोल्हापूर येथून औषधांचा साठा घेऊन आलेल्या त्या दोन गाड्यांमधील औषधांच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली.सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथून औषधांचा साठा घेऊन आलेल्या दोन गाड्यांची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना कळताच त्यांनी याबाबत महसूल विभागाला तातडीने कल्पना दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून लगेचच या गाड्या तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्या.
या गाड्यांमधील औषध साठ्यांची तपासणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर रत्नागिरीचे प्रांत डॉ. विकास सुर्यवंशी आणि तहसीलदार शशिकांत जाधव तसेच पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यात औषधांचे २८ बॉक्स आढळून आले.
खासगी वाहतूक करणाऱ्या या गाड्यांच्या चालकांकडे औषध पुरविण्याची पावती होती. मात्र, त्यांच्याकडे ही औषधे कुणी आणि कशासाठी मागवली याबाबतची माहिती मिळू शकली नाही, त्यामुळे याबाबतचा संशय अधिक बळावला आहे.हा सर्व औषधाचा साठा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपुर्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी अहवाल तयार केला असून यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे.
यात जिल्हा परिषद, अन्न व औशध प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग यांचे प्रतिनिधी असतील. या समितीमार्फत या औषधसाठप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अधीनस्थ हा निर्णय असल्याचे डॉ. जाखड यांनी सांगितले. त्यामुळे चौकशी समितीच्या चौकशीतून या औषधसाठ्याप्रकरणी सत्य पुढे आल्यानंतरच नेमके दोषी कोण, याचे उत्तर सापडणार आहे. त्यामुळे सध्या चौकशी समितीच्या चौकशीकडे लक्ष वेधून राहिले आहे.