सचिन मोहिते ल्ल देवरुखभौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेला संगमेश्वर तालुका हा डोंगर दऱ्यात वसलेला आहे. तालुक्याचा अर्धा भाग हा सह्याद्री पर्वत रांगांच्या छायेखाली येत असून तालुक्याला नैसर्गिक जलस्त्रोत चांगल्या प्रमाणात लाभले आहेत. याचाच फायदा घेत पाटबंधारे विभागाकडून अनेक धरण प्रकल्प राबवले गेले खरे, मात्र किती जमीन ओलिताखाली येऊन सुजलाम सुफलाम होऊन बनली, हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. याबरोबरच १८ वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या साडवली येथील मिनी औद्योगिक क्षेत्रात किती उद्योग उभे राहिले आणि किती हातांना रोजगार मिळाला याचा देखील विचार करणे आता क्रमप्राप्त होऊन बसले आहे.तालुक्याला नाव जरी संगमेश्वर असले तरी देखील तालुक्याचा आत्मा म्हणून देवरुखचे नाव घ्यावे लागेल. शैक्षणिक दृष्ट्या सध्या देवरुखने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या देवरुख हे नगरपंचायत झाल्याने विकासाची गंगा आणण्यासाठी मोठा वाव निर्माण झाला आहे. तरीही विकासाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्लेश्वर हे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. याबरोबरच कसबा हे मंदिरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहेच शिवाय गावात पूर्वी दोनशेहून अधिक मंदिरे होती. आरवली-राजिवली येथे गरम पाण्याची कुंडे तसेच तालुक्यातील प्रचितगड, महिपतगड या ठिकाणी पर्यटस्थळ म्हणून विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.पर्यटक या सर्व ठिकाणी पर्यटनाच्यादृष्टीने कसे आकर्षिले जातील आणि त्यांना या ठिकाणी मुलभूत सुविधा कशा नव्याने निर्माण करता येतील याकडे पाहणे गरजेचे आहे.तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांबाबत विचार होणे आवश्यक आहे. याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागतोय तालुक्याला डोंगर दऱ्या आणि नद्यांचे वरदान लाभले आहे. याचा फायदा करुन घेण्याच्यादृष्टीने तालुक्यात तब्बल लहान मोठी १३ धरणे धरण प्रकल्प राबवण्यात आले. लघू व मध्यम पाटबंधारे विभागाच्यावतीने गडगडी नदी प्रकल्प, गडनदी, कडवई, रांगव, निवे, मोर्डे आणि कोंडगाव या ठिकाणी धरण प्रकल्प राबवण्यात आले. या धरणांचे कालवे अद्यापही कोरडेच आहेत.तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकेरंच्या हस्ते गडनदी प्रकल्पाचे जलपूजन करण्यात आले यावेळी त्यांनी चार महिन्यात पाणी शेतकऱ्यांना वापरता येईल अशी घोषमा केली. तेथील पुनर्वसन झालेल्यांच्या समस्या अद्यापही कायम आहेत. रातांबी-कुचांबे येथील पुनर्वसनाच्या समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे. साडवली या गावामध्ये १९९७ च्या दरम्यान औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. तब्बल १४ हेक्टर जमीन असलेली ही मिनी एमआयडीसी देवरुखपासून ३ किमी अंतरावर तर मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर या ठिकाणापासून १५ किमी अंतरावर आहे. एमआयडीसीमध्ये ७१ प्लॉटपैकी उद्योगधारकांपैकी केवळ ८ उद्योग सुस्थितीत चालू आहेत. बाकीचे प्लॉट हे अनेकांनी केवळ लेबल लावूनच ठेवले असल्याचे दिसत आहे. २०० तरुणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या. काही उद्योगांची निर्मिती झाल्यास नोकऱ्या उपलब्ध होतील. या एमआयडीसीत ७१ पैकी ५२ प्लॉट देण्यात आले असून केवळ १९ प्लॉट रिक्त असल्याचे त्याच्या अधिकृत साईटवर दिसत आहे मात्र कोणी उद्योजग मागणी करण्यासाठी गेल्यास प्लॉट शिल्लक नसल्याचे सांगितले जाते असे अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
औद्योगिक विकासाला चालना हवी
By admin | Published: November 23, 2014 12:43 AM