आरामदायी व सुरक्षित प्रवासाचे स्वप्न भंगले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खेड : कोकणातील गौरी-गणपती उत्सव साजरा झाला असून, परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांना कोकण रेल्वेमध्ये घुसखोर प्रवाशांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. महिना, दोन महिने अगोदर रांगेत उभे राहून रेल्वे प्रशासनाला आगाऊ रेल्वे शुल्क अदा केलेल्या प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कोकणातील प्रमुख सण असलेल्या गौरी-गणपतीसाठी कोकणातील लाखो भाविक तीन ते चार महिने तयारी करतात. त्यासाठी लाखो प्रवासी दुहेरी प्रवासाचे भाडे दोन-तीन महिने आधीच जमा करतात. मात्र, एवढे मोठे उत्पन्न मिळत असूनही, कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोकणात आलेल्या भाविकांचा प्रवास आरामदायी व सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही काळजी घेताना दिसत नाही.
मंगळवारी (दि.१४) गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या प्रवाशांना यावर्षीही घुसखोर प्रवाशांचा उपद्रव अनुभवायला मिळाला. महिनाभर अगोदर आसने आरक्षित करूनही या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता आला नाही. घुसखोर प्रवाशांना आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून काही स्थानकांवर कोणताही अटकाव होताना दिसत नव्हता. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांकडे आरक्षित तिकिटे नसतील अशा प्रवाशांना रेल्वेस्थानकात प्रवेश न करण्याचे आवाहन केले होते. कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे घुसखोर प्रवाशांची संख्या यंदाही होती.
रेल्वे प्रशासन दरवर्षी गणेशोत्सवासाठी केवळ मोघम उपाययोजना सोडल्यास कोणत्याही विशेष सुविधा दिल्या जात नाहीत. कोकण रेल्वे प्रशासनाकडे या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून नगण्य संख्येत सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. त्यांची संख्या न वाढवता केवळ स्थानिक पोलीस प्रशासन व गृहरक्षक दलाची मदत घेताना दिसते. यावर्षी रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी सर्व स्थानकांत रेल्वे थांबतील अशा अनेक गाड्या सोडल्या आहेत. मात्र, तरीही गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या अनेकांनी या मार्गावरून धावणाऱ्या अन्य आरक्षित गाड्यांमध्ये घुसखोरी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला. विशेष म्हणजे आरक्षित डब्यांमध्ये तिकीट तपासनीस किंवा सुरक्षा दलाचे जवान उपस्थित नसल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांना घुसखोरांचा उपद्रव सहन करत प्रवास करावा लागला.
--आरक्षणाशिवाय प्रवास..........
कोरोना महामारीच्या काळात रेल्वे प्रवासाचा शुभारंभ करताना विना आरक्षण प्रवास करण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही या मार्गावर धावत असलेल्या आरक्षित गणपती विशेष गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीतील प्रवासी व तिकीट नसलेले काही घुसखोर प्रवेश करतात आणि त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ही घुसखोरीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.