रत्नागिरी : एका बाजूला लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे मार्ग मर्यादित झाले असताना दुसऱ्या बाजूला महागाईने आकाश गाठले असल्याने सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. गेल्या वर्षभरात जवळजवळ प्रत्येक गोष्टीचेच भाव वाढले आहेत. रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या डाळी, कडधान्य आवाक्याबाहेर जात असल्याने गरिबांसाठीचा साधा डाळभातही महाग झाला आहे. खाद्यतेलाच्या किमती तर दुपटीपेक्षा अधिक वाढल्या आहेत.
गतवर्षी खाद्यतेल ६५ ते ७० रुपये लिटर दराने विक्री सुरू होती; मात्र वर्षभरात तेलाच्या किमती १६५ ते १७० पर्यंत पोहोचल्या आहेत. कडधान्य व डाळींचे दरही कडाडले आहेत. ही दरवाढ होत असताना लाेकांचा खिसा मात्र रिकामाच आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे.
बहुतांश खाद्यतेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आयात होतात. तेथेच दर वाढल्याने पुढे स्थानिक बाजारातही तो फरक दिसत आहे. गतवर्षी पिकाचे नुकसान झाल्याने डाळी, तेलबिया, कडधान्ये महागली आहेत. वाहतुकीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचा भारही खाद्यपदार्थांच्या दरावर होत आहे.
बांधकाम व्यवसाय संकटात
सिमेंट, वाळू, चिरा, स्टीलच्या दरात वाढ झाल्याने बांधकाम व्यवसाय आर्थिक संकटात आला आहे. शिवाय लाॅकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायावर परिणाम झाला आहे. कित्येकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे आधी घरासाठी केलेले बुकींग रद्द करून ग्राहक गुंतवलेले पैसे बांधकाम व्यावसायिकांकडून परत मागत आहेत. लॉकडाऊन काळात बांधकाम बहुतांश ठप्पच होते. बांधकाम व्यावसायिकांची बहुतांश रक्कम आधीच गुंतलेली असताना आणि नव्याने विक्री होत नसताना बुकींग रद्द करणाऱ्यांचे पैसे देणे त्यांना अवघड होत आहे.
गॅसचे अनुदान बंद. गेले वर्षभर गॅस सिलिंडरवर देण्यात येणारे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. सध्या ८५० रुपये दराने गॅस सिलिंडरची विक्री सुरू आहे. अनुदान १५० ते २५० रुपये देण्यात येत होते. ७०० ते ७५० रुपये दराने प्राप्त होणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी ८५० रुपये मोजावे लागत आहेत.
आरोग्य विमा महागला
वैद्यकीय उपचार महागल्याने आरोग्य विमा कवच सुरक्षित वाटू लागले आहे. दोन वर्षांपर्यंत आरोग्य विमा कवचाची रक्कम ग्राहकांसाठी सुलभ होती; मात्र गतवर्षीपासून त्यामध्ये चाैपट वाढ झाली आहे. एक लाखाच्या विमा कवचासाठी एक हजार ते दीड हजार रुपये गुंतवावे लागत असत; मात्र सध्या त्याच विम्यासाठी चार ते साडेचार हजार रुपये भरावे लागत असल्याने दरवर्षी कुटुंबीयांसाठी विमा कवच काढणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
डिश रिचार्जचे दर वाढले
करमणूक करावरील वाढीचा परिणाम डीश रिचार्जवर झाला आहे. शंभर ते दीडशे रुपयांत २८ ते २९ दिवसांचे रिचार्ज प्राप्त होत होते; मात्र त्यासाठी आता ४०० ते ४५० रुपये खर्च करावे लागत आहेत. टी.व्ही ऐवजी लोक इंटरनेटचे पॅकेज घेऊन मोबाइल किंवा लॅपटाॅपवर पाहिजे ते चॅनेल किंवा चॅनेलवरील आवडीचा कार्यक्रम पाहत आहेत.
इंधन दरात वाढ
गेले वर्षभरात इंधन दरात सातत्याने वाढ झाली आहे. सध्या पेट्रोल ९९.८३ रुपये तर डिझेल ८९.८२ रुपये दराने विकण्यात येत आहे. गतवर्षी आंतरराष्ट्रीय दरातील वाढीमुळेच इंधनदरात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुचाकींना दरवाढीचा वेग
लॉकडाऊन काळात विक्रीला आलेली मर्यादा लक्षात घेता सर्वच उत्पादकांनी किमतीत वाढ केली आहे. त्यातून दुचाकीही सुटलेल्या नाहीत. दुचाकींचा दरवाढीचा वेग वाढला आहे. गतवर्षी ज्या दुचाकीला ६० ते ६५ हजार रुपये मोजावे लागत होते, तेथे आता ८० ते ८५ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
..............................
इंधन दरवाढ व पिकांचे नुकसान हे जरी कारण जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढीसाठी सांगण्यात येत असले तरी दरवाढीवर शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही, हे स्पष्ट आहे. खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या वाढत्या किमतीने कंबरडे मोडले आहे.
- शमिका रामाणी, गृहिणी.
.................
कोरोनामुळे कामधंदे बंद असल्यामुळे आर्थिक प्राप्तीवर परिणाम झाला आहे. डाळी, कडधान्यांच्या किमतीत २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. खाद्यतेल तर दुपटीपेक्षा अधिक वाढले आहे. घाऊक बाजारातील दरवाढीमुळे किरकोळ विक्रीवर परिणाम होत आहे.
- आशुतोष शितुत, सदस्य, रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघ.