रत्नागिरी : बाप्पाच्या नैवेद्याला घरोघरी उकडीचे मोदक तयार केले जात असले तरी प्रसादासाठी लाडू, पेढे, साखरफुटाणे यांची खरेदी आवर्जून केली जाते. व्यावसायिकांनी मोदक, पेढे, साखरफुटाणे, पंचखाद्य, लाडू विक्रीसाठी आणले आहे. मात्र, वाढत्या महागाईची झळ बाप्पाच्या प्रसादालाही बसली आहे.
गणपतीच्या पूजेला फळे, मिठाई, घरी केलेला नैवेद्य ठेवण्यात येतो. मात्र, गणपतीच्या दर्शनासाठी येणारे भाविकही येताना काहीतरी प्रसाद जरूर घेऊन येतात. दर्शनासाठी येणाऱ्यांचे स्वागत यथोचित केले जाते, शिवाय त्यांचा पाहुणचार केला जातो. गणेशोत्सवात खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने घरगुती पदार्थ कितीही केले तरी मिठाईच्या दुकानातून लाडू, पेढे, फरसाण, चिवडा, लाडू खरेदी सुरू आहे.
गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना पंचखाद्यांचा प्रसाद ठेवला जातो. खडीसाखर, शेंगदाणे, खोबरे, खारीक, मनुके (बेदाणे) घालून तयार केलेले पंचखाद्य ३५०, ४०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. साखरफुटाणे (वेलचीदाणे) खडीसाखरेची १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नैवेद्यासाठी गोडी बुंदी २०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. गणेशोत्सवात पेढ्यांना विशेष मागणी होते. ३५० ते ६०० रुपये दराने पेढ्यांची विक्री सुरू आहे. खव्याच्या पेढ्यालाच मोदकांचा आकार दिलेले पेढे मोदक बाजारात विकण्यास आले. विविध कंपन्यांनी २१ मोदकांचे पाकीट विक्रीस ठेवताना विविध स्वादाला अग्रक्रम दिल्याने आंबा मोदक, काजू मोदक, स्ट्रॉबेरी मोदक, चॉकलेट मोदक, काजू मोदक, मावा मोदक, मलई केशर मोदकांना विशेष मागणी होते. मोदकाचे दर १२० ते ५५० रुपये किलो आहेत. काजू मोदकाची ८०० ते ९०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
गणेशोत्सवात मोदकाप्रमाणे लाडूलाही महत्त्व आहे. रवा, बेसन, मोतिचूर लाडूला मागणी होत आहे. कडकबुंदीचे लाडू २५० ते ३०० रुपये दराने विकण्यात येत आहेत. गणपत्ती बाप्पाला लाडू मोदक अर्पण केले जातात. मोठा ‘जम्बो’ मोदक किंवा मोठा लाडू ठेवला जातो. पाव किलोपासून एक किलोपर्यंतचे लाडू, मोदक विक्रीस उपलब्ध आहेत. तिरंगी मोदक, काजू मोदक, ड्रायफ्रूट मोदक स्वरूपात उपलब्ध आहेत. मिठाईमध्ये मँगो बर्फी, पिस्ता, अंजीर, केशर, ऑरेंज, काजू, खवा आदी प्रकारात बर्फीचे विविध प्रकाराबरोबर काजू कतली, अंजीर कतली विक्री सुरू आहे.
चिवड्यांचेही विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. बॉम्बे चिवडा, भाजक्या पोह्यांचा चिवडा, कच्चा चिवडा, मक्याचा चिवडा, डायट चिवडा, उपवासाचा बटाट्याचा चिवडा तसेच फरसाणला मागणी होते. २५० ते ४५० रुपये दराने चिवडा, फरसाणाची विक्री सुरू आहे. वाढत्या महागाईचा परिणाम नैवेद्याच्या पदार्थांवरही झाला आहे.