रत्नागिरी : जिल्ह्यात नेपाळ व भुतान या शेजारी देशांमधून रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना पासपोर्टची सक्ती नाही. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या या परदेशी कामगारांची नोंद आढळून येत नाही.
यातील कोणी देशात गुन्हा करून पसार झाला तर त्याचा शोध एका क्लीकवर शोध घेणे यापुढे शक्य होणार आहे. त्यासाठी रत्नागिरीपोलिसांनी आयडी 24 x 7 नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपवर नेपाळ, भुतान व अन्य देशातून येऊन रत्नागिरीत कामानिमित्त वास्तव्य करणाऱ्यांच्या माहितीची कुंडलीच नोंदवली जाणार आहे.१ मे २०१९ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत या अॅपची सुरूवात करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात विविध कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या नेपाळी नागरिकांची माहिती संकलित करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हे अॅप तयार करण्यात आलेले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांनी पालकमंत्री रविंद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जि.प.अध्यक्ष स्वरुपा साळवी, सेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, पत्रकार, ग्रामस्थ यांच्यासमोर प्रथम या अॅपचे सादरीकरण झाले त्यानंतर अनावरण करण्यात आले.या अॅपमध्ये नेपाळी नागरिकांची पोलीस ठाणे निहाय माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामध्ये नेपाळ, भुतान येथील कामगारांचे संपूर्ण नाव, अलीकडील फोटो, नेपाळमधील व सध्या वास्तव्याचा पत्ता, संपर्क क्रमांक, स्वाक्षरी, किमान दोन नातेवाईकांची नावे व संपर्क क्रमांक, कंपनी, एजंट, मालक, बागायदार, नौका मालक इत्यादींचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक, नेपाळ देशाचा नागरिक असल्याबाबतचे विधीग्राह्य प्रमाणपत्र इ. माहितीचा समावेश असेल.या अॅपमध्ये माहितीची नोंंद झाल्यानंतर त्यांना पोलीस ठाणेस्तरावर बारकोड असलेले ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे या अॅपद्वारे पोलीस अमंलदारानी ओळखपत्रावरील बारकोड मोबाईवर स्कॅन केल्यास त्यांना या नेपाळी नागरिकांची संपूर्ण माहिती मोबाईल स्क्रीनवर त्वरित उपलब्ध होईल.
या अॅपमुळे नेपाळी भुतान व अन्य देशांच्या रत्नागिरी जिल्ह्यात रोजगारासाठी वास्तव्याला असलेल्या नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर जतन करुन ठेवणे आणि त्या नागरिकांची ओळख पटविणे जिल्हा पोलीस दलासाठी अतिशय सोपे होणार आहे. हे अॅप गद्रे इन्फोटेक प्रा.लि.चे वैभव गोगटे, अनुज देवस्थळी आणि अमेय बापट यांनी तयार केले आहे.अॅप तुर्त जिल्हा मर्यादीतसध्यातरी या अॅपचा वापर फक्त जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमलंदार यांनाच करता येईल. रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या नेपाळी, भुतानच्या कामगारांसाठी हे अॅप सध्या वापरले जाणार आहे. अॅपची यशस्वीता पाहून हा उपक्रम राज्यभरातही राबविला जाण्याची शक्यता आहे.